Gandhi Godse – Ek Yudh : गांधी गोडसे एक विचारांचे युद्ध (सगळेच सकारात्मक)

एमपीसी न्यूज : नुकतेच ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा (Gandhi Godse – Ek Yudh) सिनेमा बघितला. खरे तर महात्मा गांधी आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे हे खरतर दोघे ही भिन्न विचारांचे असल्यानेच हा संघर्ष झाला. तस म्हंटल तर आजही हे दोन्ही विचार आणि त्यांचे समर्थक यांच्यात 36 चा आकडा आहेच आहे. आणि कदाचित पुढेही यात बदल होण्याची आत्ता तरी शक्यता नाही.

गांधी आणि गोडसे हे तसे आज नाट्य चित्रपटांच्या बाबतीत समोरासमोर येणे हे वादग्रस्तच मानले जाते. नथुराम गोडसे यांनी गोळ्या झाडून महात्मा गांधींची हत्या केली. हा प्रसंग कुठल्याही चित्रपटासाठी आणि नाटकासाठी वादग्रस्त आणि अवघड प्रसंगच ठरू शकतो. या प्रसंगाला अनेक कंगोरे आहेत.

या प्रसंगाच्या मागे आणि पुढे खूप गोष्टी घडून गेलेल्या आहेत. जेव्हा ह्या प्रसंगाचा आपण विचार करतो. तेव्हा सगळेच संदर्भ आणि आपली स्वत:ची विचारसरणी आपल्याला तपासून पाहावी लागते. त्याला विरोध होणारच हेही गृहीत धरावे लागते. एका अर्थाने या विषयावर काहीही करणे हे जोखमीचेच काम आहे.

ख्यातनाम दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी आणि त्यांच्या टीमने ही जोखीम पत्करली आहे. इथे या गांधी गोडसे एक युद्ध या चित्रपटात वास्तवाला कल्पनेची जोड मिळाली आहे. आणि वास्तवाची, घडलेल्या भूतकाळाची दाहकता कमी करून ‘असे झाले असते तर?’ कदाचित हे दोघे एकत्र आले असते तर, त्यांच्यातला वाद फक्त तात्विक रुपात विचारांच्याच पातळीवर झाला असता आणि शेवटी ते दोघेही कुठेतरी एका विचारांच्या मनमोहक बागेत एकत्र आले असते तर, फार बरे झाले असते!’ असे मत चित्रपटातून प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न (Gandhi Godse – Ek Yudh) दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि टीमने केला आहे.

सुप्रसिद्ध लेखक असगर वजाहत यांच्या “गोडसे@गांधी.कॉम” या सुप्रसिद्ध नाटकावर हा गांधी गोडसे एक युद्ध हा सिनेमा बेतलेला आहे. असगर वजाहत यांनी राजकुमार संतोषी यांच्या बरोबरीने या सिनेमाच्या लेखनात मजा आणली आहे. त्यांनी लिहिलेले संवाद वास्तववादी झालेले आहेत. त्यात कमालीचा संयम आहे. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता, उगाच टाळ्यांच्या मोहात न पडता प्रसंगानुरूप आणि त्या त्या पात्रांशी एकरूप होऊन संवाद लिहिले गेलेले आहेत. स्वत: राजकुमार संतोषी यांनीही आपल्या मनातल्या गोष्टीशी प्रामाणिक राहून पटकथा लिहिली आहे.

समजा, नथुराम गोडसे यांच्याकडून महात्मा गांधींची हत्या झालीच नसती तर..आणि दोघेही एकाच ठिकाणी अनेक दिवस एकत्र असते तर, मुळात हा एक कल्पनाविलास आहे. पण, शेवटपर्यंत आपणही प्रेक्षक म्हणून तल्लीन होऊन जातो. आणि प्रत्येक प्रसंग बघताना असेच वाटत राहते राहून राहून कि, हे असेच व्हायला हवे होते.

कलाकारांच्या अभिनयाच्या बाबतीत बोलायचे तर, महात्मा गांधी यांची मुख्य भूमिका करणारे दीपक अंतानी यांनी गांधीजींच्या भूमिकेचा आणि देहबोलीचा बारकाईने अभ्यास केल्याचे जाणवते. अनेक प्रसंगात साक्षात आपल्याला गांधीजीच आहेत आणि आपण ऐतिहासिक चित्रीकरण प्रत्यक्ष पाहतोय असे वाटते.

नथुराम गोडसे यांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे. म्हणजे या दोन्ही भूमिकांचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे कि, चित्रपटगृहातून बाहेर येताना आपल्या डोळ्यासमोर गांधीजी आणि नथुराम म्हणून दीपक अंतानी आणि चिन्मय मांडलेकर यांचाच चेहरा तरळत राहतो.

चिन्मय मांडलेकर यांनीही फार वेगळा नथुराम सादर केला आहे. आपल्या मुलभूत अभिनेता म्हणून आतमध्ये असलेला संयम कुठेही ढळू न देता, उगाचच आक्रस्ताळेपणा न आणता भूमिकेशी प्रामाणिक राहून प्रसंगानुरूप अभिनय चिन्मय यांनी एक जबरदस्त परिणाम साधला आहे. तसे बाकी सगळ्याच कलाकारांचा अभिनय फार छान झाला (Gandhi Godse – Ek Yudh) आहे.

विशेष उल्लेख अजून एक करावासा वाटतो तो म्हणजे अभिनेत्री तनिशा संतोषी यांनी साकारलेली सुषमा फारच अप्रतिम. विशेषत: ‘वैष्णव जन तो तेणे कहिये रे’ हे श्रेया घोशाल यांनी गायलेल्या गाण्यावर अप्रतिम लिपसिंग (पडद्यावर गायले) केले आहे. वास्तविक ह्या गाण्यावर अभिनय करणे हे तसे अवघड काम आहे. पण, ते तनिशा यांनी लीलया केले आहे. त्यांचा कुठलाच अभिनय हा खोटा नाही वाटत, हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे.

गाण्याच्या आणि संगीताच्या बाबतीत म्हणायचे, तर सध्याच्या सिने संगीतातील शेवटचा शब्द ज्यांचा मानावा असे संगीतकार ए. आर. रेहमान यांचे संगीत या चित्रपटाला लाभलंय. रेहमान यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या अफलातून शैलीच्या संगीतातून या सिनेमाला चार चांद लावले आहेत.

तसेच, हा सिनेमा दृश्यांच्या बाबतीत खूपच वास्तववादी झाला आहे. याचे कारण ऋषी पंजाबी यांनी या चित्रपटाचे छायांकन (cinematography) अत्यंत कमाल केले आहे. तर, या सगळ्यांच्या पात्रांचे हुबेहूब दिसणे हे सुप्रसिद्ध मेकपमन विक्रम गायकवाड यांची कमाल आहे. त्यांनी केलेली मेहनत आणि अभ्यास, व्यासंग हे जाणवते. प्रत्येक पात्राच्या दिसण्यावर खूप विस्तृत काम केले आहे, हे जाणवते….!!!

एकूण गांधी गोडसे एक युद्ध हा सिनेमा प्रत्येकाने एकदा तरी बघितलाच पाहिजे. खूप गोष्टी नव्याने कळतील जेणेकरून आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात केलेल्या चुका, अपराध आपण कसे विचार करून टाळू शकतो, हाच धडा आपल्याला मिळतो.

पुन्हा एकदा राजकुमार संतोषी आणि टीमचे या (Gandhi Godse – Ek Yudh) चित्रपटाच्या निर्मितीबद्दल खूप खूप कौतुक.

 

– हर्षल आल्पे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.