Pune : गांधीजींना पुन्हा मरू देणार नाही, यासाठी गांधी शांती यात्रा – यशवंत सिन्हा

नागरिकत्व नोंदणी, नागरिकत्व सुधारणा काळा कायदा मागे घ्या : यशवंत सिन्हा

एमपीसी न्यूज – नागरिकत्व नोंदणी, सुधारणा कायदा हा काळा कायदा असून तो मागे घ्यावा, ही मागणी घेऊन गांधी शांती यात्रा आम्ही सुरू केली आहे. संविधान रक्षण करणे, एकतेचा संदेश देणे आणि गांधीजींना पुन्हा मरू न देणे. हा हेतू त्यामागे आहे, असे मत ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) ते राजघाट (दिल्ली) या मार्गावर आज ९ जानेवारी सुरू झालेली गांधी शांती यात्रा आजच सायंकाळी पुण्यात आली. गांधीभवन येथे डॉ कुमार सप्तर्षी, अन्वर राजन, शिवाजीराव कदम, अभय छाजेड यांनी स्वागत केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत यशवंत सिन्हा बोलत होते. यावेळी अभिनेते, नेते शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डॉ कुमार सप्तर्षी, आशिष देशमुख उपस्थित होते.

यशवंत सिन्हा म्हणाले,’गांधीजींच्या विचारांच्या विरोधात काम सुरू आहे. नागरिकता कायदा काळा आणि विभाजनवादी कायदा संसदेत नागरिकत्व कायदा मागे घ्या ही मागणी आहे. एनआरसी लागू करणार, घुसखोरांना हाकलणार हे गृहमंत्र्यांचे शब्द होते. भय निर्माण झाले आहे. सरकार याला धार्मिक रंग देऊ पाहत आहे. सरकारपुरस्कृत हिंसा विद्यापीठात होत आहे. या दोषींवर कारवाई झाली पाहिजे.

२१ दिवसांची गांधी शांती यात्रा या मागण्यांसाठी आहे. राजघाटवर ३० जानेवारीला सर्व समाजातील घटक एकत्र येऊ. यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. देशाची जनता आजही गांधींजींसमवेत आहे. संविधान रक्षणाची शपथ गेट वे ऑफ इंडिया वर आम्ही घेतली. शांती, एकतेचे संदेश घेऊन आम्ही यात्रेवर आहोत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘देशाविरुद्ध काम सध्या चालू आहे. शांतता धोक्यात आणली जात आहे. देशाला याची किंमत मोजावी लागत आहे. छुपा अजेंडा पुढे आणला जात आहे. गांधींचा विचार मारण्याचे कारस्थान चालू आहे. राजकीय विचारांच्या पुढे जाऊन संविधान विचाराची लढाई लढण्याची गरज आहे.’ डॉ. कुमार सप्तर्षी यांनी स्वागत केले.

आशिष देशमुख म्हणाले,’ विद्यापीठ कुलगुरू आणि इतर नियुक्त्या रद्द कराव्या, या नियुक्त्या संघ विचारांच्या व्यक्तींच्या झालेल्या आहेत.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले,’ देशाची युवा शक्ती आज अशांत आहे. पुन्हा जयप्रकाश नारायण यांची चळवळ सुरू असल्याचे वांतावरण निर्माण झाले आहे. काही लोकांच्या अहंकारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधानांनी विश्वासार्हता गमावली आहे, राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या भाषणात अभिनय आहे, पोकळपण आहे. ते बोलतात एक, करतात भलतेच. सर्वधर्मीय आज एकत्रपणे संविधान रक्षणासाठी आंदोलनात उतरले आहेत.

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ जेव्हा पक्ष कमी पडतात तेव्हा जनता रस्त्यावर उतरून लोकशाही व्यवस्था संरक्षणासाठी चळवळ करते, असे जयप्रकाश नारायण यांनी सांगितले होते. पुण्यातील आताच्या आंदोलनात युक्रांद हा समान धागा आहे. पुण्यावर कोणी मालकी सांगू नये. येथील सामाजिक सर्वसमावेशक वातावरण आम्ही जिवंत ठेवू. हिटलरच्या मार्गाने जाणाऱ्यांसाठी आत्महत्या हा शेवटचा मुक्काम असतो.’ माध्यमांनी सत्याला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.