Chinchwad : गांधीपेठ तालीम मित्रमंडळाला विघ्नहर्ता पुरस्कार

एमपीसी   न्यूज –   सुमारे चाळीस वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या गांधीपेठ तालीम मित्रमंडळाला आदर्श गणेशोत्सव स्पर्धा 2017चा विसर्जन मिरवणूक प्रथम क्रमांक आणि सजावटीसाठी द्वितीय क्रमांकाचा विघ्नहर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पोलीस मुख्यालयात पुणे येथे आदर्श गणेशोत्सव स्पर्धा 2017चा विसर्जन मिरवणूक प्रथम क्रमांक आणि सजावटीसाठी द्वितीय क्रमांकाचा विघ्नहर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशन्, पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे, पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव; तसेच सार्वजनिक गणेश मंडळांचे अध्यक्ष-पदाधिकारी आदी   उपस्थित होते. पुणे शहर पोलीस विघ्नहर्ता न्यास आयोजित आदर्श गणेशोत्सव स्पर्धा 2017 साठी परिमंडळ तीन अंतर्गत गांधीपेठ तालीम मित्रमंडळ गणेशोत्सवाला पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक प्रदान करून गौरवण्यात आले.

गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, पदाधिकारी विपुल नेवाळे, अनुप पाटील, सोन्या जमदाडे, गोपी बाफना, राहुल वाघुले, रोहन जाधव, दत्ता संगमे, कलाप्पा जमखंडी, संतोष गावडे, नवनाथ सरडे यांनी दोन्ही पुरस्कार स्वीकारले. मागील वर्षीच्या गणेशोत्सवापर्यंत पिंपरी-चिंचवड परिसर हा पुणे पोलीस आयुक्तालयाशी संलग्न असल्याने पुरस्कार स्वीकारण्याचे हे अंतिम वर्ष होते; तसेच शंभर वर्षां पेक्षाही जास्त परंपरा असलेल्या मानाच्या गणपती मंडळांच्या आणि विशेष प्रतिष्ठा असलेल्या गणेश मंडळांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारताना गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना विशेष आनंद झाला. या वर्षापासून पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून विघ्नहर्ता न्यास स्पर्धांचे आयोजन करणार आहे.

यावेळी  गिरीश बापट यांनी, “गणेशोत्सव हे सामाजिक एकोपा वाढवण्याचे माध्यम असून धार्मिक बंधुभाव वृद्धिंगत करीत कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे कार्य सर्व मंडळे यापुढील काळातही करतील!” असा विश्वास व्यक्त केला. डॉ.मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.