Maval News : सुनील शेळके भाजपच्या तिकिटावर निवडून आले असते तर…. – गणेश भेगडे

एमपीसी न्यूज – कालपर्यंत मावळातील लोक म्हणत होते की, सुनील शेळके यांना भाजपाकडून उमेदवारी द्यायला हवी होती. आमचाही समज तोच झाला होता. आम्हाला सुद्धा निर्णय करताना चूक झाली असे सुरुवातीला वाटले. पण दोन वर्षांनंतर आमदार सुनील शेळके यांचा कारभार पाहील्यानंतर तिकिट नाही दिले, आम्ही घेतलेला निर्णय, आमची भूमिका योग्य होती हे मनोमन पटलं. याच तिकिटावर आमच्या पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले असते तर दिवंगत रामभाऊ म्हाळगी व केशवराव वाडेकर यांनी आम्हाला माफ केले नसते, अशी सडकून टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केली आहे.

गणेश भेगडे यांनी रविवारी (दि.16) वडगाव मावळ येथे पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. मावळ भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एकमेकांवरील आरोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मोठ्यांना खुर्ची देणे ही हुजरेगिरी नसून संस्कृती आहे, असे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले होते. त्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पलटवार केला असून ‘सत्ता टिकवून ठेवण्यासाठी शरद पवार यांना पुढे करत त्यांना खुर्ची देणे, याला हुजरेगिरीच म्हणतात’ असे भेगडे यांनी म्हटले आहे. गणेश भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना भाजपकडून उमेदवारी देण्यापासून तालुक्यातील विकासकामे आणि अन्य विषयांवर पत्रकार परिषदेत मत मांडले.

आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत राजकीय मुद्दे मांडायला हवे होते, मात्र ते वैयक्तिक पातळीवर घसरले. त्यांचा आक्रस्ताळपणा दिसून आला. रागाच्या भरात वैयक्तिक पातळीवर घसरले. तालुक्यात सौहार्द असावा, खेळीमेळीचे वातावरण असावे, आपल्याकडून चुकीच्या पोस्ट न टाकता त्याबाबत दक्षता घेतली पाहीजे. कार्यकर्त्यांना त्याबाबत मी सूचना दिल्या होत्या. आमदार सुनील शेळके यांनी या माध्यमातून तालुक्यात वेगळी भूमिका घ्यायला हवी होती, तशी न घेता एक अजब प्रकार केला, असल्याचे भेगडे म्हणाले.

मावळला वेगळाच इतिहास आहे. सन 1952 पासून सरदार दाभाडे, रामभाऊ म्हाळगी, मामासाहेब मोहोळ, रघुनाथ सातकर, कृष्णराव भेगडे, बी एस गाडे पाटील, मदन बाफना, रूपलेखा ढोरे, दिगंबर भेगडे व बाळा भेगडे ह्या आमदारांची पार्श्वभूमी, त्यांचा संयम व काम करण्याची पध्दत यांच्या पंक्तीत आपण कुठे बसतो याबाबत आत्मपरीक्षण आमदार शेळके यांनी करायला हवे, असा सल्ला देखील गणेश भेगडे यांनी आमदार शेळके यांना दिला आहे.

झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्याची चांगली संधी आमदार शेळके यांनी गमावली आहे. मी वैयक्तिक जीवनात टिका करणार नाही. मग तुमच्यात आणि माझ्यात फरक काय? मी तुम्हाला राजकीय आरसा दाखवला तर तुम्ही चिडलात असे म्हणत संजय राऊत यांनी शरद पवार यांना दिलेल्या खुर्चीच्या प्रसंगावर बोलताना भेगडे म्हणाले, “होय… ती हुजरेगिरीच आहे असे माझे मत आहे. स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी पुढे पुढे करणे अर्थात खुर्ची देणे ही हुजरेगिरीच आहे. शिवसेनेच्याबद्दल आमदारांनी भांडणे लावण्याचे काम करू नये. बाळासाहेब ठाकरे आजही, कालही व उद्याही वंदनीय राहतील.”

आमदार शेळके यांना सत्तेचा अहंकार झाला आहे. तुमची काम करण्याची स्टाईल असेलही मात्र जनतेला ती आवडेल की नाही, याचा विचार करा. पत्रकार परिषदेतही आमदारांची अहंकाराचीच भाषा होती. पराभव पचवावा लागतो तसा विजय सुद्धा पचवता आला पाहीजे. आपल्याकडे सत्ता असल्याने पोलिसांमार्फत कार्यकर्त्यांचे धंदे बंद करण्याचा प्रयत्न करीत आहात. त्याबद्दल आपण आत्मपरीक्षण करावे. तुमचे वागणे, त्रास देण्याची भूमिका आहे. सतेच्या बळावर चालू आहे. सत्ता ही येत जात राहते.

लेबर सप्लाय करणे हा माझा धंदा आहे. महिंद्रा कंपनीचा संप चालू असताना दादागिरी करून काॅन्ट्रक्ट घेतले नाही, आणि कोणत्याच कंपनीत कधीच दादागिरी केली नाही. पुणे जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात साधी एनसीची नोंद नाही. आमदार साहेब एमआयडीसीमध्ये कशाप्रकारची दादागिरी करता याबाबत अजित पवारांकडे याबाबत तक्रारी गेल्या आहेत. पण उंदराला मांजर साक्ष. तळेगाव उत्खननात भ्रष्टाचार झाला म्हणता त्यावेळी आपण भाजपात सामिल होता. ज्या केसमध्ये दमच नाही, त्यावर राजकीय दबाव आणून नगरसेवकांवर कारणे दाखवा नोटीस काढली. तळेगाव नगरपरिषद निवडणूक जवळ आल्याने आमदारांनी हे पाऊल उचलले आहे. लोणावळ्यातील नगरसेवक माझ्या पाठीशी आहेत, लोणावळ्यात फार मोठा तीर मारला नाही. वैयक्तिक पातळीवर आपण उतरले, राजकीय मुद्दे सोडून बोललात, घटनेनुसार कोणालाही कुठेही फिरता येते, असेही गणेश भेगडे म्हणाले.

विकासाचे इमले बांधण्याचे काम करू नका, आंबीचा पूल, आर्डव, सांगवडे, टाकवे पुलाची कामे झाली नाहीत. शेळके साहेब तुमची आमदारकी, तुम्हाला लकलाभ ठरो असे म्हणत भेगडे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत राजकीय जीवनावर बोललो, व्यक्तिगत जीवनावर नाही, मला माझ्या मर्यादा कळतात, असेही आमदार सुनील शेळके यांना उद्देशून सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.