Pune : पुणे महापालिका पदाधिकारी बदलताना गणेश बिडकर यांनी बजावली महत्वाची भूमिका

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते बदलताना भाजपचे पुणे शहर चिटणीस तथा स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर, 3 मतदारसंघात विजय मिळविता मिळविता नाकीनऊ आले होते. खडकवासला मतदारसंघात तर भिमराव तापकीर यांचा केवळ 2600 मतांनी विजय झाला.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा पराभव होण्यास पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार कारणीभूत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. त्यामुळे हे पदाधिकारी तातडीने बदलण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या वरिष्ठांकडे करण्यात आली होती. सुनील कांबळे आणि सिद्धार्थ शिरोळे आमदार झाल्याने त्यांच्याकडील अतिरिक्त पदभार कमी करण्यात आला. महापौरपदी मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने, तर सभागृह नेतेपदी धीरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे.

हे पदाधिकारी बदलताना गणेश बिडकर यांनी महत्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे या निवडी होत असताना बिडकर स्वतः जातीने उपस्थित होते. अगामी काळात त्यांचा महापालिका कारभारात सहभाग वाढणार असल्याची कूजबूज आहे. आगामी महापालिका निवडणुकीत या पाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. बिडकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जवळचे मानले जातात. खासदार गिरीश बापट यांच्याशी त्यांचे फार काही पटत नाही.

बिडकर यांचा 2017 च्या महापालिका निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे ते महापालिका कामकाजापासून अलिप्त राहिले होते. त्यांना पुन्हा सक्रीय करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिडकर यांना स्वीकृत नगरसेवक करण्याचे आदेश दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.