कलाकारांचा गणेशोत्सव !

(दीनानाथ घारपुरे)

आनंद पालव

मी कोकणातला, दक्षिण कोकणातला, आमच्या गावात वर्षानुवर्षे गणपती असतो. आमच्या आजोबा-पणजोबांपासून गणपतीची प्रतिष्ठापना होते. एकरा दिवस गणपती घरी असतो. आम्ही आठ ते दहा जण मुंबईत स्थायिक आहोत. आम्ही सगळे गणपती उत्सवासाठी सहकुटुंब सहपरिवार गावी जातो. आमच्याकडे मूर्ती प्रथेप्रमाणे शाडूची मूर्ती असते. गणपतीची आरास ही फुलांचीच असते. तसेच दरवर्षीप्रमाणे खास करून घेतलेले कापडी पडदे असतात. कार्येक्रमामध्ये भजनाचे कार्येक्रम होतात. प्रसादासाठी विविध पदार्थ केले जातात. मोदक वगैरे आणि कोकणातले खास पदार्थांचे नैवेद्य दाखवले जातात. ह्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने एक वेगळा छान उत्सव साजरा केला जातो. सगळे जण एकत्र येतात.

सार्वजनिक गणपतीचे स्वरूप हे गर्दी जमवणे, त्याची जाहिरात करणे असे स्वरूप झाले आहे. आता ह्या गणपती उत्सवासाठी बाहेरची- मुंबई बाहेरची माणसे खूप येतात. गर्दी वाढते. वाहतुकीवर परिणाम होतो. आताचे कार्येक्रम समाजप्रबोधन कमी करतात. वाद्यवृंद, चित्रपट हेच अधिक प्रमाणात दिसून येतात. आज ध्वनिप्रदूषणाचे/ वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. एका ध्वनिप्रदूषणाच्या शॉर्टफिल्ममध्ये माझा सहभाग होता. विसर्जनाची मिरवणुक पारंपारिक पद्धतीने व्हायला हवी.

उपेंद्र दाते

गणपती उत्सव जवळ आला कि एक प्रकारचा उत्साह सगळीकडे पसरतो. एकतर गणपतीवर सर्वांची श्रद्धा असते. सर्वांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. घरगुती गणपती प्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव असतो. लहानपणापासून गणपती उत्सवाचे आकर्षण असते. तसे मलाही होते. पण कालांतराने झाले काय गणपती उत्सवामध्ये करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जातात. अश्या ह्या समारंभांमध्ये त्या काळात नाटके सादर व्हायची, आपली पण स्वतःची संस्था असावी असे नेहमी वाटायचे. आणि हक्काचे प्रयोग कुठे मिळणार तर गणेशोत्सवात. मग मी स्वतःच्या नाट्यसंस्थेतर्फे नाटके सादर करायला सुरुवात केली. त्यावेळी व्यावसायिक नाटके मी करीत होतोच. ‘चंद्रलेखा ‘ ह्या लोकप्रिय संस्थेमध्ये काम करीत होतो. पण त्यावेळी गणपती उत्सवात दहा दिवस चंद्रलेखा नाटके करायची नाही, मग ते दहा दिवस पूर्णपणे सुटी असायची. आणि मग दहा दिवस त्या संस्थेचे कलाकार, तंत्रज्ञ, त्यांच्या मदतीने,व बहुमूल्य सहकार्यामुळेच मी प्रयोग करू शकलो. व ज्या ठिकाणी मोठी नाटके झाली नाहीत अश्या ठिकाणी जाऊन प्रयोग सादर करायचो. ह्या गणपती उत्सवामुळे माझी संस्थासुद्धा तग धरू शकली. गणपतीचा आशीर्वाद मला सदैव मिळत गेला

आज मी पंचेचाळीस वर्षे माझी नाट्यसंस्था चालवतोय. त्याची सुरुवात झाली ती गणेशोत्सवाने. गणेशाने प्रेरणा दिली, मार्ग दाखवला. आजकाल दुरदर्शन/ वाहिनीचा प्रभाव लोकांवर इतका पडला आहे कि त्यांचे आवडीचे कार्येक्रम पाहून झाल्यावर लोक मंडपांमध्ये येतात. त्यामुळे प्रबोधन आणि उत्सव असे जे आधी स्वरूप होते ते आता कमी झाले आहे. मिरवणुकीचे वातावरणसुद्धा आता बदलत चालले आहे.

सुधीर ठाकूर

हे कळवा येथे राहणारे असून साहित्य संघात पहिल्यापासून ध्वनियंत्रणा सांभाळत आहे. त्यांच्याकडे गौरी-गणपती दरवर्षीप्रमाणे बसवतात. आमच्याकडील गणपतीला शंभर वर्ष सहज झाली असतील. गणपतीपुढे विविध प्रकारची सजावट करण्यात येते. ती दरवर्षी आकर्षित करण्यात येते. आमच्याकडे ही गणपतीची मूर्ती शाडूची बनवलेली असते. दररोज विधिव्रत पूजा, अर्चा, आरती, प्रसाद, हे सारेजण सर्व श्रद्धेने करतात. आमच कुटुंब/ कुटुंबामधील सदस्य एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात. सजावट ही पौराणिक किंवा ऐतिहासिक स्वरूपाची असते. त्यामध्ये आतापर्यंत समुद्रमंथन चा देखावा/ गोरा कुंभार चा देखावा, रामायणमधील काही सीन केले. ह्यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांना श्री तुळजाभवानीने तलवार दिली हा देखावा आहे. आजचा सार्वजनिक गणपती उत्सव हा उत्सव पाहिल्याप्रमाणे राहिला नाही आहे. मिरवणुक ही पारंपारिक पद्धतीने व्हायला हवी असे माझे मत आहे.

प्रमोद पवार

माझ्या घरी गणपती येतो तो गावी येतो. मी कोकणातला आहे. आणि कोकणातली माणस गणपतीचा उत्सव जोरदारपणे साजरा करतात. त्यांचे महत्वाचे दोनच सण आहेत. एक म्हणजे गणपती उत्सव व दुसरा सण होळी. गणपतीला आम्हाला गावाला जावच लागत. मी किंवा माझा भाऊ किंवा आम्ही दोघे एकत्र गावी जातो. आता आम्ही गणपतीची शाडूची मूर्ती मुंबईवरून घेऊन जातो. पण गावामध्ये सर्वसाधारण मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्याच असतात. आता पूजेसाठी लहान मूर्ती आणि घरी एक कायमस्वरूपाची मूर्ती करून घेणार आहोत. गावाला पूर्वी मोठमोठ्या मुर्त्या तयार केलया जायच्या, पण त्या नेण्या-आणण्यासाठी वेगळी सोय करायला लागायची.

आमच्या घरचा गणपती पूर्वी दहा दिवसाचा होता. आता तो आम्ही गौरी-गणपती विसर्जनाच्या दिवशी विसर्जित करतो. पूजा ही पारंपारिक पद्धतीने होते. आरास वगैरे करण्यापेक्षा जितक्या साधेपणाने उत्सव करता येईल अशी आमच्या सर्वांची धारणा झालेली आहे. त्यामुळे माझ्या भावाने छानसे टेबल/आरसा बनविला आहे. त्याबाजूला सुरेखशी फुलांची आरास केली जाते. काही वर्षांपूर्वी मी पुठ्ठयांचे सुरेख मखर घेऊन गेलो होतो.

सार्वजनिक गणपतीचे स्वरूप आता बघितले तर खूप त्रास होतो. मी लोकमान्य टिळकांची भूमिका केलेली असलयाने ते अधिक जाणवते. लोकांना जागृत करण्यासाठी सुरु केलेला गणपती उत्सव आता फक्त नाचण्यासाठी मर्यादित राहिला आहे. पूर्वी विसर्जनाच्यावेळी गर्दी व्हायची. आता त्याचा सोहळा झाला आहे. मिरवणुकीचे स्वरूप आता बदलत चालले आहे. ढोल, ताशा, लेझीमपथक ह्यांना घेऊन साधेपणाने भजन म्हणत मिरवणूक व्हायला हवी.

सरिता मेहेंदळे जोशी

गणपती उत्सव हा माझा लाडका उत्सव आहे. आपलयाकडे पाहुणा आला कि आपण त्याचे जसे स्वागत करतो त्याप्रमाणे त्याचे स्वागत केले जाते. त्याच्या येण्याने सर्व घरातील वातावरण आनंदमय होते. मी सांगलीची आहे. माझे नुकतेच लग्न झाले आहे. सासरी गणपती उत्सवाचे माझे पहिलेच वर्ष आहे. आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो. पण माझ्या माहेरी सांगलीला पाच दिवसाचा गणपती असायचा. तिथलया सांगलीच्या आठवणी आता माझ्याकडे खूप आहेत, माहेरच्या आठवणी मी सांगते.

आमच्याकडे पाच दिवसाचा गणपती असायचा, गणपतीची मूर्ती ही शाडूची आहे. ज्यावेळी तुम्ही बाप्पाच विसर्जन करता तेव्हा ती मूर्ती विरघळलीच पाहिजे. आपण मनापासून श्रद्धेने बाप्पाची सेवा,पूजा,अर्चना करत असतो. त्याला तडा जाता कामा नये. गणपतीची पारंपारिक पद्धतीने पूजा केली जाते. माझ्या बाबांनासुद्धा गणपती उत्सवाची/ पूजेची खूप आवड असलयाने पूजा व्यवस्थित करण्यात येते. तसेच देखावा, आरास, सजावट सुंदर पद्धतीने आम्ही करतो. आदलया दिवशी हरतालिका असतात. त्यादिवशी संध्याकाळपासून त्याची तयारी सुरु व्हायची. सजावट, आरासमध्ये मोठा वाटा बाबांचा असायचा. दरवर्षी नवीन सजावट केली जायची. त्याचे सर्व सामान हे बाबा स्वतः घेऊन यायचे. गणपतीची वर्षभर वाट बघितलेली असायची. आणि विसर्जनानंतर अत्यंत वाईट वाटायचे. पुन्हा पुढील वर्षापर्यंत वाट बघत बसायला लागायची. गणपतीची मूर्तीसुद्धा मोठी असते. प्रसाद रोज वेगवेगळा असायचा. पाच दिवसात कोणता प्रसाद बनवायचा याची यादी तयार केली जायची. उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक हवेच. गणपती आवर्तन/ अथर्वशीर्ष घरीच केले जायचे. आई-बाबा भाऊ मी आणि आजी असे आम्ही रोज रात्री अथर्वशीर्ष्याचे पठण केले जायचे. (२१ वेळा म्हणायचे). ते म्हणलयावर एकदम प्रसन्न वाटायचे.

सार्वजनिक गणेशोत्सव करताना रस्त्याच्या मधोमध मंडप उभारतात. त्यामुळे रहदारीला अडथळा येतो. डीजे लावले जातात त्याचा त्रास होतो. ह्याची काळजी मंडळांनी घ्यायला हवी. पहिलया दिवशी गणपती आगमनाच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी ढोल, ताशा, लेझीम यांच्या पथकाने आगमन/ विसर्जनाच्या दिवशी मिरवणुक काढली जावी. गणपती हा आनंदाचा उत्सव आहे. तो आनंद घेऊनच साजरा करावा. डीजे लावून मोठ्या आवाजात तो साजरा करू नये असे मला वाटते. कार्येक्रमांमध्ये लहान मुलांचा, कीर्तन, भजनाचा, विचार केला जावा. कार्येक्रम आयोजित करताना तो कार्येक्रम बाप्पाला आवडत आहे का ह्याचा आपण थोडासा विचार करावा. एक गाव एक गणपती ह्या संकल्पनेनुसार गणपतीची स्थापना केली तर खूपच चांगल होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.