_MPC_DIR_MPU_III

Ganesh Utsav 2020 : बाप्पाला गणेशभक्तांचा भावपूर्ण निरोप;पन्नास हजाराहून अधिक गणेशमूर्तींचे संकलन

पुढच्या वर्षी गणपती बाप्पाचे स्वागत बंधनमुक्त पद्धतीने करण्याचा भक्तांचा निर्धार

एमपीसी न्यूज – पुढच्या वर्षी गणपती बाप्पाचे स्वागत बंधनमुक्त पद्धतीने करू, असा विश्वास व्यक्त करून यावर्षी लाडक्या बाप्पाला गणेश भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक न काढण्याच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवाहनाला शहरातील गणेश मंडळानी चांगला प्रतिसाद दिला आहे. गणेश मंडळासह घरगुती गणपतीच्या मूर्ती पालिकेकडे सुपूर्द केल्या. शहरात पन्नास हजाराहून अधिक गणेशमूर्तींचे संकलन झाले. पालिकेच्या वतीने संकलित केलेल्या गणेश मूर्तींचे वाकड, विनोदे वस्ती येथे विधिवत विसर्जन केले जाणार आहे.

_MPC_DIR_MPU_IV

दहा दिवसांच्या घरगुती गणपती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे आज महापालिकेच्या सूचनेनुसार मूर्ती संकलित करून विधीवत पूजन व आरती करुन विसर्जन करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक काढण्यात येवू नये तसेच गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी घाटावर बंदी घातली असल्यामुळे मूर्ती दान करण्यालाच गणेशभक्तांनी प्राधान्य दिले. त्यानुसार पालिकेच्या वतीने व अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या वतीने ठिक ठिकाणी मूर्ती संकलित करण्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात आले होते.

तसेच, फिरते विसर्जन हौद व काही ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौद तयार करण्यात आले होते. गणेश भक्तांनी सोयीनुसार मूर्ती दान करण्यावर व विसर्जन हौदात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यावर भर दिला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीला बंदी असल्यामुळे दरवर्षी पाहायला मिळणारी गर्दी, ढोल ताशांचा आवाज, रोषणाई व जल्लोष यावर्षी पाहायला मिळाला नाही.

_MPC_DIR_MPU_II

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी व मूर्ती संकलन केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गणेश भक्तांनी सुद्धा सर्व नियमांचे पालन करत व सामाजिक अंतर ठेवून बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. पुढल्या वर्षी बंधनमुक्त लाडक्या बाप्पाचे स्वागत करू असा विश्वास गणेश भक्तांनी व्यक्त केला.

यंदा सर्वसामान्य नागरिकांना विसर्जन घाटांवर जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध असल्याने महापालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नागरिकांकडून मूर्ती संकलित केल्या.

चिंचवडमध्ये मोरया गोसावी मंदिराजवळ तसेच रावेत पुलानजीक मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड येथील घाटावर गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले.

गणेश विसर्जनाला सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणेश भक्तांचे सहकार्य लाभले. पालिकेच्या वतीने गणेश मूर्तीचे विसर्जन घरातच करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

ज्यांना विसर्जनाची सुविधा नाही त्यांच्यासाठी ठिकठिकाणी मूर्ती संकलन व विसर्जनासाठी कृत्रिम हौद उपलब्ध करुन देण्यात आले होते.

महापालिकेच्या आठही प्रभागात हा उपक्रम राबवण्यात आला. शहरात पन्नास हजाराहून अधिक गणेशमूर्तींचे संकलन झाले असून संकलित केलेल्या सर्व मुर्त्यांचे पालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन केले जाणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.