Ganesh Utsav 2020 : मानाचे व प्रमुख गणपती मंडळ उत्सव मंडप व मंदिरातच करणार ‘श्रीं’चे विसर्जन

मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिका-यांची पत्रकार परिषदेत माहिती

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व सेवा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यावर्षी मानाच्या व प्रमुख गणपतींची प्राणप्रतिष्ठापना व धार्मिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने केले जात आहेत. आता ‘श्रीं’चे विसर्जन देखील सांगता मिरवणूक न होता उत्सव मंडप व मंदिरातच करणार असल्याची माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, केसरी वाडा गणपतीचे अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, पुनीत बालन यांसह नितीन पंडित, पृथ्वीराज परदेशी आदी उपस्थित होते.

मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन ‘श्रीं’चे विसर्जन उत्सव मंडप व मंदिरातच करण्याचा निर्णय घेतला.

सकाळी साडे दहावाजता श्री कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता कसबा गणपतीचे विसर्जन होईल.

_MPC_DIR_MPU_II

त्याचप्रमाणे श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी साडेबारा वाजता, श्री गुरुजी तालीमचा गणपती दुपारी एक वाजता, श्री तुळशीबाग गणपती दुपारी 1.45 वाजता, केसरी वाडा गणपती दुपारी 2.30 वाजता, श्रीमंत भाऊ भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दुपारी 3.15 वाजता, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सूर्यास्ताच्या वेळी, अखिल मंडई मंडळाचा गणपती सायंकाळी 7 वाजता विसर्जन होईल.

यंदा कोरोनाचे सावट पाहता उत्सव साधेपणाने साजरा करीत असतानाच मानाच्या व प्रमुख गणपती मंडळे गणेश मंडळांच्याच पदाधिका-यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करुन एक वेगळा आदर्श घालून दिला. आता ‘श्रीं’चे विसर्जन देखील अत्यंत साधेपणाने करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील इतर गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या उत्सव मंडप किंवा मंदिरात आणि नागरिकांनी घरच्या घरी गणरायाचे विसर्जन करावे. तसेच फिरत्या हौदांचा देखील उपयोग करावा. याद्वारे कोरोनाशी सुरु असलेली लढाई लवकर संपविणे शक्य होईल, असे आवाहनही या मंडळांतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीनिमित्त सोमवार, दि. 31 ऑगस्ट रोजी पूर्वसंध्येला मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी एकत्रपणे केसरी वाडयात आरती करुन लोकमान्यांना मानवंदना देणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.