Ganesh Utsav 2020 : …अन उरल्या गणेश विसर्जनाच्या केवळ आठवणी

अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहिल्यांदाच सामसूम असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर आठवणींचा उजाळा देण्यात आला.

एमपीसी न्यूज – तरुणाईचा जल्लोष… कार्यकर्त्यांचा उत्साह… ढोल ताश्यांचा निनाद…भक्तीचा महासागर… गुलालाची उधळण… रात्रभर जागरण… गणपती बाप्पा मोरया…च्या गगनभेदी घोषणा आणि डोळे दिपविणारा विसर्जन मिरवणूक सोहळा !. कोरोनाच्या संकटामुळे या सगळ्यालाच पुणेकरांनी मंगळवारी मिस केले.

गत 40/45 वर्षांची प्रथा, परंपरा खंडित होवू द्यायची नाही, असे माजी महापौर अंकुश काकडे यांनी ठरविले. सालाबादप्रमाणे सर्वपक्षीय कार्यकर्ते आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी आझाद क्लोथ स्टोअर्स लक्ष्मी रस्ता येथे सकाळी 11 वाजता एकत्र आले. मग रंगला तो गप्पांचा फड.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहिल्यांदाच सामसूम असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर आठवणींचा उजाळा देण्यात आला.

महापौर मुरलीधर मोहोळ, उल्हासदादा पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, डॉ. सतीश देसाई, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, उपमहापौर सरस्वती शेंडगे, रवींद्र माळवदकर, महेश सूर्यवंशी, वीरेंद्र किराड, सुनिल माने, रवी चौधरी, शैलेश गुजर, मृणाल ववले, सतीश मोहोळ, सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे,उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी उपस्थिती लावून सर्वांच्या आनंदात भर घातली.

पत्रकार अद्वैत मेहता, अमोल कविटकर, प्रशांत आहेर यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीने गप्पागोष्टी रंगल्या. उत्तम कटारिया यांनी उपस्थितांचा शाल देऊन सत्कार केला.

यावर्षी सर्वांनीच मानपान बाजूला ठेवून अतिशय साधेपणाने आणि भान राखून उत्सव साजरा केल्याबद्दल सर्वांनीच गणेशमंडळांच्या कार्यकर्त्यांचा गौरवपुर्ण उल्लेख केला.

साधारण 88 सालापासून मी या मिरवणुकीचा एक भाग आहे. अलका चौकात महापौर यांच्या स्वागत मंडपासमोर पतित पावन संघटनेचा स्वागत मांडव असतो. रात्रभर तेथे माईकवर चालणारी जुगलबंदी ही पुणेकरांसाठी एक पर्वणीच असते.

आज जमलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी एखाददुसरा अपवाद वगळता या मिरवणुकीला कधी गालबोट लागू दिले नाही. विविध विचारसरणीच्या नेत्यांनी एकत्र येउन उत्सवात सहभागी होणे हे पुण्याचे सांस्कृतिक वैभव म्हणावे लागेल.

आता पुढच्या वर्षी गणपती बाप्पाने विघ्न हरावे आणि त्याच जल्लोषात गणेशोत्सव पार पाडण्यासाठी हे संकट दूर करावे या प्रार्थनेसह ही मैफिल संपली, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.