Ganesh Utsav 2020 : ‘कोरोनाचे विघ्न दूर करून पुढच्या वर्षी लवकर या’; मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन

आज विसर्जनाच्या दिवशी प्रथमच पुणे शहरातील प्रसिद्ध रस्ता लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता शांत जाणवत आहे.

एमपीसी न्यूज – ‘कोरोनाचे विघ्न दूर करून पुढच्या वर्षी लवकर या’, असे साकडे घालत पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे मंगळवारी दुपारी दोन वाजण्यापूर्वी विसर्जन करण्यात आले. आज विसर्जनाच्या दिवशी प्रथमच पुणे शहरातील प्रसिद्ध रस्ता लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता शांत जाणवत आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असून बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जनाला प्रारंभ होण्याआधी आज परंपरा राखत लोकमान्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक यांच्यस उपस्थितीतीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन शांततेत करण्याचे आवाहन शासन आणि पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले होते. त्यामुळे यंदा ना ढोल, ना ताशा, ना बँड केवळ जल्लोषपूर्ण घोषणा देऊन बाप्पांचा जयजयकार करण्यात आला.

पुण्यनगरीचं ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री. कसबा गणपतीचं पुणेकरांच्या वतीनं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दर्शन घेतले. त्यानंतर विसर्जनाला सुरुवात केली. परंपरेचा भाग म्हणून काही पावले पुढे जात मांडपात तयार केलेल्या कृत्रिम हौदात सकाळी साडे अकरा वाजता कसबा गणपतीचे विसर्जन संपन्न झाले.

आमदार मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यावेळी उपस्थित होते. ग्रामदेवता आणि मानाचा दुसरा श्री. तांबडी जोगेश्वरी गणपतीचं पुष्पहार अर्पण करुन महापौरांनी दर्शन घेतलं. या मंडळानेही मंडपासमोर कृत्रिम हौद उभारून बाप्पाचं विसर्जन केलं.

महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद मानत असल्याचे महापौरांनी सांगितले.

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाने मोजक्याच गणेश भक्तांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजता बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीला दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी निरोप देण्यात आला. तर, मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा गणपतीचे दुपारी 1 वा. 35 मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.

पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. त्यामध्ये पारंपरिक ढोल, ताशा वंदन अत्यंत महत्वपूर्ण मानला जाते. डीजेच्या तालावर तरूणाई रात्रभर थिरकत असते. यंदा मात्र कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे विसर्जन मिरवणुकीचा हा जल्लोष पुणेकरांनी मिस केला.

आज विसर्जनाच्या दिवशी प्रथमच पुणे शहरातील प्रसिद्ध रस्ता लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता शांत जाणवत आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असून बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.