Ganeshostav 2020: श्री गणेशाची भारतातील महत्वाची स्थाने

वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत. गणपतीला इतर काही नावे आहेत.

एमपीसी न्यूज- गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकरपार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. पुराण साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पुराण साहित्यात गणपतीच्या विविध नावांचा उल्लेख आहे. व्यासांनी रचलेल्या महाभारत या ग्रंथाचा लेखनिक होता. त्याने व्यासांना अट घातली होती की व्यासांनी अखंडपणे त्याला महाभारत सांगितले पाहिजे. मधे मधे थांबता कामा नये.

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक या शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरुपाने जो नायक (नेता) आहे तो. याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचलित आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय.

वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत. गणपतीला इतर काही नावे आहेत. वक्रतुण्ड म्हणजे “ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो”. गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला.

दुसर्‍या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक सुळा मोडला. आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला. महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा व लंब वा लांबडे उदर (पोट) असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात.

विघ्नराज वा विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपति असा आहे. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपति व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाम प्राप्त झाले.

अष्टविनायकाची जागृत देवस्थाने आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेतच. त्यात पहिला गणपती म्हणजे मोरगावचा श्री मयूरेश्वर, नंतर अनुक्रमे थेऊरचा श्री चिंतामणी, सिद्धटेकचा श्री सिद्धीविनायक, रांजणगावचा श्री महागणपती, ओझरचा श्री विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा श्री गिरीजात्मक, महडचा श्री वरदविनायक आणि पालीचा श्री बल्लाळेश्वर असे आहेत.

त्याशिवाय अष्टगणपतींची देखील देवस्थाने आहेत. यामध्ये आशाणे, कर्जतजवळील कडाव, जांभुळपाडा, मुघोली, गणपतीपुळे, हेदवी, गुहागर आणि दिवेआगारच्या गणेश मंदिरांचा समावेश आहे. या आठही मंदिरातील स्वयंभू गणेशमूर्ती, त्या मूर्तीमधील जागृत देवत्व यामुळे त्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

या अष्टविनायकांप्रमाणेच विदर्भातदेखील गणपतीची आठ महत्त्वाची क्षेत्रे आहेत. या गणेशाच्या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ म्हटले जाते. यात नागपूर येथील टेकडी गणपती, आदासा येथील शमी विघ्नेश, रामटेक येथील अष्टदशभुज, मेंढा, भंडारा येथील भृशुंड, पवनी येथील सर्वतोभद्र, केळझर, वर्धा येथील सिद्धिविनायक, कळंब, यवतमाळ येथील चिंतामणी व भद्रावती, चंद्रपूर येथील वरदविनायक यांचा समावेश आहे.

प्रयाग येथील ओंकार गणपती आणि काशी येथील ढुंढिराज वा धुंडीराज गणपती, कळंब (जि. यवतमाळ) येथील चिंतामणीक्षेत्र आणि अदोष येथील शमी विघ्नेश, नर्मदेच्या काठी पारिनेर हे मंगलमूर्ती क्षेत्र आणि गोदावरीच्या काठी गंगामसले (जि. परभणी) हे भालचंद्रगणेश क्षेत्र, गोदावरीच्या काठी राक्षसभुवन (जि. औरंगाबाद) येथील विज्ञानगणेश क्षेत्र, तेलंगणात विजयपूर येथील गणेश, वेरुळ येथील लक्षविनायक, पाचोऱ्याजवळील पद्मालय येथील सहस्रार्जुनाचा उपास्य गणेश, जालन्याजवळील नामलगाव येथील गणपती, राजूर (जि. औरंगाबाद) येथील गणपती, कावेरी तटावर कुंभकोणम् येथील श्वेत–विघ्नेश्वर तीर्थ, मुरुड नांदगाव (जि. रायगड) येथील गणेश, गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) हे मंगलमूर्तींचे महास्थान इ. गणपतीची क्षेत्रे प्रसिद्ध आहेत.  याखेरीज टिटवाळा (जि. कुलाबा) आणि कर्नाटक राज्यात इडगुंजी, कुरुडमळे, शिर्शी व शिराळी या क्षेत्रांत महागणपतीची स्थाने आहेत.

याशिवाय महाराष्ट्रातील मुंबईच्या सिद्धिविनायक व टिटवाळ्याच्या गणपतीचा समावेश होतो. पुण्यात सारसबाग येथील उजव्या सोंडेचा गणपती प्रसिद्ध आहे. पुण्याचे ग्रामदैवतही गणपतीच आहे. कसब्यातील ह्या गणपतीची पूजा जिजाबाई करत असत. तसेच पुण्यातील दगडूशेठ हलवाई यांच्या गणेशावर देखील अनेक भाविकांची नितांत श्रद्धा आहे. जळगाव येथे उजव्या व डाव्या सोंडेच्या गणपतीचे एकत्रित मंदिर आहे. अशा स्वरुपाचे एकत्र मंदिर दुर्मीळ आहे. वाईच्या ढोल्या गणपतीची विशालकाय मूर्ती प्रेक्षणीय आहे.

महाराष्ट्राबाहेर उत्तर भारतातील मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन, राजस्थानमधील जोधपूर, रायपूर, बिहार राज्यातील वैद्यनाथ, गुजरातमधील बडोदा, धोलका व बलसाड येथील गणपती, उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील धुंडिराज मंदिर आदि उल्लेख योग्य मंदिरे आहेत. दक्षिण भारतातील गणेश मंदिरांमध्ये तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्लीचे जम्बुकेश्वर मंदिर, रामेश्वरम व सुचिन्द्रम येथील मंदिर, कर्नाटक राज्यातील हंपी, इडागुंजी, आंध्र प्रदेश राज्यातील भद्राचलमचे मंदिर आणि केरळमधील कासारगोड ही देखील महत्वाची मंदिरे आहेत.

भारताबाहेर नेपाळ मध्येही अनेक मंदिरे आहेत. तसेच जावा, सुमात्रा बेटे, श्रीलंका, अफगाणिस्तान येथे देखील गणेश मंदिरे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.