Ganeshostav 2020: आधी वंदू तुज मोरया…

गणपती हा विघ्नकर्ता व विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी त्याचे पूजन करण्याची प्रथा सर्व हिंदू, बौद्ध व जैन यांच्यामध्ये आहे.

एमपीसी न्यूज –
ओम नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जयजय स्वसंवेद्या | आत्मरुपा ||
देवा तुचि गणेशु| सकलमतिप्रकाशु| म्हणे निवृत्तीदासु | अवधारिजोजी ||

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओवीत त्या जगन्नियंत्याला साष्टांग वंदन करुन त्याची करुणा भाकली आहे. वेदांना पूजनीय अशा तुझे ॐ हे मंगलकारक नाम आहे, तू सर्व कार्यरुप सृष्टीच्या पूर्वी कारणरुपाने असतोस, वेदांनी ज्या तुझे एकाचेच अनेक रुपांनी वर्णन केले आहे, जो तू स्वसंवेद्य म्हणजे आपणच आपल्याला जाणणारा असून दुस-या कशानेही जाणला जाऊ शकत नाहीस, ज्या तुझा स्वसंवेद्य (सच्चिदानंद) रुपाने जयजयकार असून जो तू सर्व जीवांचे ठिकाणी आत्मस्वरुपानेही आहेस, त्या तुला नमस्कार करतो असे म्हणून गणरायाला वंदन केले आहे.

उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. अनेक निर्बंध सांभाळून आपल्याला गणरायाचे स्वागत करायचे आहे. पण जो विघ्नहर्ताच आहे त्याच्या पूजनाने आपोआपच सगळ्या विघ्नांचा नाश होणार आहे हीच प्रत्येकाची मनोमन भावना आहे.

गणपती हा विघ्नकर्ता व विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी त्याचे पूजन करण्याची प्रथा सर्व हिंदू, बौद्ध व जैन यांच्यामध्ये आहे. शुभकार्यारंभी पूजनाच्या वेळी गणपतीची मूर्तीच असावी असे नाही. तांदूळ किंवा गहू यांच्या पुंजीवर सुपारी ठेवून तिला गणपतीस्वरुप मानून त्यावर गणपतीचे आवाहन करुन पूजा होते व अखेर त्याचे विसर्जन होते.

गणपतीचे शिर हे गजाचे असले, तरी त्याचा एक तुटलेला दात हातात असतो व दुसरा मुखाला असतो. त्याचे उंदीर हे वाहन आहे. तो चतुर्हस्त असून दात, पाश, अंकुश अशा वस्तू त्याने निरनिराळ्या हातांत धारण केलेल्या असून चौथा हात वरद म्हणजे वर देणारा असतो.

ऋद्धी व सिद्धी ह्या त्याच्या पार्श्वदेवता होत. प्रारंभी तो द्विभुज असावा नंतर तो चार, आठ, दहा व सोळा हातांचा झाला. त्रिमुख गणपतीच्या मूर्ती जपानमध्ये व चतुर्मुख मूर्ती ख्मेरमध्ये आढळतात. शंकराप्रमाणेच काही मूर्तीच्या कमरेभोवती किंवा गळ्याभोवती सर्पाचे वेष्टन असते. तिबेटात गणपतीला नारीरुपातही भजतात. त्याचे उंदीर हे वाहन प्रसिद्ध असले, तरी सिंह हेही त्याचे वाहन नेपाळातील मूर्तींत दिसते. हिंदूंच्या घराच्या अथवा मंदिराच्या मुख्य द्वारावर गणपतीची मूर्ती कोरण्याची जुनी प्रथा आहे.

शिवपुत्र गणपतीच्या अनेक कथांपैकी एक कथा अशी – गणपती हा केवळ शिवाचा पुत्र होय. शिवाने आपल्या तपःसामर्थ्याने एक सुंदर पुत्र निर्माण केला. पार्वतीने त्यास पाहिले व ती क्रुद्ध झाली. एकट्या शिवाने आपणास वगळून पुत्र निर्माण केला, हे तिला आवडले नाही. तिने त्या बालकास शाप देऊन बेडौल व गजमुख बनविले.

दुसरी एक निराळ्या प्रकारची कथा आहे – एकदा पार्वती स्नानगृहात स्नान करीत होती. आपल्या अंगचा मळ काढून त्यातून तिने एक पुरुष बनविला व स्नानगृहाचा द्वाररक्षक म्हणून उभा केला. थोड्याच वेळात शिव तेथे आला. त्याला द्वाररक्षकाने अडविले, तेव्हा शिवाने क्रुद्ध होऊन त्याचे मस्तक उडविले. पार्वती दुःखी झाली. तिच्या सांत्वनार्थ शिवाने इंद्राच्या हत्तीचे मस्तक आणून या द्वाररक्षकाच्या धडाला जोडले तोच गणपती होय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.