एमपीसी न्यूज- लाडक्या बाप्पाचे आज घरोघरी आगमन होत आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी गणेश भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. मोठ्या भक्तिभावाने आज गणरायाची प्रतिष्ठापणा केली जात आहे.

श्रीगणेशाचे आज आगमन झाल्यानंतर पुढील 11 दिवस घरोघरी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवात अनेक धार्मिक विधी केले जातात. त्याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. अनेकांच्या मनात अनेक प्रश्नं असतात. भाविकांना पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं खास ‘एमपीसी’च्या वाचकांसाठी सुप्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहेत. आजच्या भागात काही निवडक प्रश्नं पुढीलप्रमाणे…

1. घरात गणपतीची प्रतिष्ठापना सुरू करायची असल्यास आणि सुरू असलेली बंद करायची असल्यास नेमके काय करावे लागते?

– गणेश चतुर्थीचं व्रत हे प्रतिवार्षिक व्रत आहे. हा कुलधर्म किंवा कुलाचार नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीची घरात गणेशोत्सव सुरु करण्याची इच्छा असेल त्यांना गणेशोत्सव, गणपतीची प्रतिष्ठापना करता येते. त्यासाठी कोणत्याही वेगळ्या विधीची आवश्यकता नाही.

तसेच एकदा सुरु केलेले व्रत शक्यतो अखंड सुरु ठेवावे. मात्र काही अडचणींमुळे ते शक्य नसल्यास बंद देखील करता येते. जसा सुरु करण्यासाठी विधी नाही, तसाच तो बंद करण्यासाठी देखील विधी नाही.

2. गणपतीची मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी असं सांगण्यात येतं त्यामागे नेमके काही कारण आहे का?

– या दिवशी पार्थिव गणेश पूजन सांगितलं आहे. म्हणजे मातीच्या गणपतीची पूजा. पूर्वीच्या काळी लोक घराच्या परसातली माती किंवा नदी किनारची माती आणून घरीच मूर्ती तयार करून पूजन करीत. त्यामुळे नदीकाठच्या मातीपासून आलेली मूर्ती नदी अथवा प्रवाहित पाणी जिथे असेल अशा ठिकाणी विसर्जित करावी.

तसेच वेदात सर्व देवता पाण्याच्या आश्रयाने असतात, असे सांगितले आहे. पाण्यात विसर्जन करण्याला विशेष महत्व आहे. त्यामुळे आता आपल्याला जिथे पाणी उपलब्ध असेल तिथे विसर्जन करावे. अनेक ठिकाणी स्वतंत्र हौद, तलाव केलेले असतात. तेथील पाणी वाहते नसले, तरीही त्यात विसर्जन करता येते. तसेच घरात मोठ्या बादलीत विसर्जन करता येईल.

3. गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाची फुले वाहतात, त्यामागे काही विशेष कारण आहे का?

– आपल्याकडे सर्वच देवतांना विशिष्ट फुलं, पत्री वाहण्याची प्रथा आहे. जसे विठोबाला तुळस, शंकराला बेल, गणपतीला दूर्वा आणि जास्वंदाची फुले आवडण्याबाबत अनेक कथा आहेत. यासर्वच देवतांची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. ते तत्व आपल्यापर्यंत जास्तीत जास्त पोचावं यासाठी आपण त्यांचं पूजन करतो, उत्सव साजरे करतो.

दूर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व जास्तीत जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे गणपतीला दूर्वा वाहिल्या जातात. या दूर्वा शक्यतो कोवळ्या अन् लहान आकाराच्या एकत्र जुडी करून वाहाव्यात. दूर्वांना 3, 5, 7 अशा विषम संख्येच्या पात्या असाव्या.

गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणे महत्त्वाचे मानले जाते. याचे कारण म्हणजे गणपतीचा वर्ण शेंदरी / लाल आहे. पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते.

4. गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेताना ज्याच्या हातात मूर्ती असेल त्या व्यक्तिने डोक्यावर टोपी घालणे किंवा रुमाल घेण्यामागचे कारण काय?

– कोणतेही धार्मिक कार्य करताना ठराविक वेषभूषा असते. पूर्वीच्या काळी सर्वच लोक डोक्यावर टोपी, मुंडासं, पगडी वापरीत असत. तसेच खांद्यावर उपरणं असे पूर्ण पोशाख केलेला असे. हल्ली तसे नसते म्हणून आवर्जून डोक्यावर टोपी घालावी लागते.