Ganeshotsav 2020: प्रश्न तुमचे, उत्तर पंचांगकर्ते दाते यांचे; मूर्तीस फक्त पहिल्याच दिवशी बेल पत्र, दुर्वा, इतर फुले का वाहतात?

एमपीसी न्यूज- गणेशोत्सवात अनेक धार्मिक विधी केले जातात. त्याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. अनेकांच्या मनात अनेक प्रश्नं असतात. भाविकांना पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं खास ‘एमपीसी’च्या वाचकांसाठी सुप्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहेत. आजच्या भागात काही निवडक प्रश्न पुढीलप्रमाणे…

1. POP वापरल्यामुळं मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत मग नंतर त्या जेसीबीने उचलून इतर ठिकाणी हलवतात तर यामध्ये श्रद्धेला तड़ा जातो असं नाही का वाटतं ?

– अशा पद्धतीने मूर्ती हाताळल्या जाताना पाहून वाईट नक्कीच वाटते. पण याच्यातून आपणच मार्ग काढायला हवा. उत्सवप्रियतेमुळे गणेशमूर्तींचे आकार जसेजसे वाढत गेले तशी POP च्या मूर्तींची आवश्यकता निर्माण झाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवमूर्ती व पूजनाची मूर्ती अशा वेगवेगळ्या मूर्ती ठेवल्यास काही प्रमाणात ही समस्या कमी होईल.

पूजनाकरिता ठेवली जाणारी छोटी मूर्ती मातीची असावी व तिचे विसर्जन करावे. मोठी मूर्ती तशीच ठेवून काही वर्षे वापरावी. घरगुती गणेशमूर्ती मातीच्याच असाव्यात आपणच ही काळजी घेतल्यास असे प्रसंग उद्भवणार नाहीत.

2. गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा का करावी ? त्याचा विधि करणं क्रमप्राप्त आहे का ?

– आपण जेव्हा बाजारातून मूर्ती आणतो. पण जेव्हा आपण विधीवत् त्याचं पूजन करून प्राणप्रतिष्ठापना करतो, तेव्हाच त्यात देवत्व येतं असं मानलं जातं. आपण केवळ मूर्तीचं पूजन करीत नाही तर त्यातील देवत्वाचं पूजन करतो. त्यामुळे प्राणप्रतिष्ठापना व विधीवत् पूजन करणं आवश्यकच आहे. कोणत्याही देवतेचे मंत्रांनीच आवाहन व विसर्जन होत असते.

3. मूर्तीस फक्त पहिल्याच दिवशी बेल पत्र, दुर्वा आणि इतर फुले का वाहतात? इतर दिवशी का नाही ?

– सर्वच देवतांना सर्व प्रकारची फुलं, पत्री वाहिली जात नाही. पण पार्थिव गणेशपूजनाच्या व्रतामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी अशी पत्री वाहिलेली चालते असं सांगितलं आहे. एखाद्यांनी रोजच वाहायची ठरवल्यास तसंही करता येईल. पण या दिवशी वाहण्याचं विशेष महत्त्व आहे.

4. श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशतत्व पृथ्वीवर असतं असं म्हणतात मग या दरम्यान आराधना कशी करावी ?

– श्री गणेश चतुर्थीचं व्रत हे काही जणांकडे दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, गौरी विसर्जनापर्यंत, अनंत चतुर्दशी पर्यंत अशा वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. या गणेशोत्सवाच्या काळात यथाशक्ती गणेशाची उपासना करून उत्सव साजरा करावा. ज्यांना गणपतीची जी स्तोत्रं / श्लोक येत असतील ते म्हणावेत.

गणेशोत्सव हा घरातील प्रत्येकाने सहभागी होण्याचा उत्सव आहे त्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्री-पुरुष सर्वचजण आपापल्यापरीने सहभाग देऊ शकतात. या कालावधीमध्ये घरातील वातावरण चांगले राहिल, प्रसन्न राहील याची काळजी घ्यावी.

जेवढे दिवस आपल्या घरी गणेशोत्सव असेल तेवढे दिवस सकाळी व संध्याकाळी पूजा करावी दोन्ही वेळेस पूजा करणे शक्य नसल्यास सकाळी पूजा व संध्याकाळी किमान आरती करावी. गोडाधोडाचा स्वयंपाक करावा, सात्विक अन्न खावे व आनंदात गणेशोत्सव साजरा करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.