Ganeshotsav 2020: प्रश्न तुमचे, उत्तर पंचांगकर्ते दाते यांचे; गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आणताना तिचा चेहरा अर्धवट का झाकतात?

गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेला आणताना असा चेहरा झाकण्याची आवश्यकता नाही.

एमपीसी न्यूज- गणेशोत्सवात अनेक धार्मिक विधी केले जातात. त्याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. अनेकांच्या मनात अनेक प्रश्नं असतात. भाविकांना पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं खास ‘एमपीसी’च्या वाचकांसाठी सुप्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहेत. आजच्या भागात काही निवडक प्रश्नं पुढीलप्रमाणे…

1. गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आणताना तिचा चेहरा अर्धवट झाकण्यामागचे कारण काय ?

– गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेला आणताना असा चेहरा झाकण्याची आवश्यकता नाही. काही प्रदेशात अशा प्रकारची रूढी आहे. पण धर्मशास्त्रीयदृष्ट्या त्याला काहीही कारण नाही.

2. गणपतीचा वार मंगळवार या मागचे कारण काय ?

– अंगारक नावाचा गणेशाचा एक भक्त होता, अंगारक म्हणजेच मंगळ त्याला गणेशाने तसा वर दिला की इथून पुढे मंगळवार हा गणेशाचा वार म्हणून मानला जाईल.

3. गणपतीसमोर विशिष्ट संख्येच्या मोदकांचा प्रसाद ठेवला जातो त्यामागचे कारण काय ?

– प्रत्येक देवतेच्या काही संख्या आहेत जसे 12 रवि, 11 रुद्र म्हणजेच शंकर त्याप्रमाणे गणेशाची संख्या 21 आहे म्हणून 21 मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो.

4. सध्या इको-फ्रेंडली गणेश मूर्तीबद्दल बोललं जातं, मग या गणेश मूर्ती घरात विसर्जन करणं कितपत शास्त्राला धरून आहे ?

– आपले सर्व सणउत्सव हे निसर्गाशी सांगड घालूनच साजरे होतात. गणेशोत्सवातील गणपतीची मूर्ती मातीची असावी. POP हे निसर्गासाठी हानिकारकही आहे आणि ती माती देखील नाही. त्यामुळे इको फ्रेंडली गणपती हा निसर्गाच्या आणि मातीच्या अधिक जवळ जाणारा असल्याने POP पेक्षा कधीही अधिक योग्य ठरेल.

सर्वोत्तम पर्याय मातीच्या गणपतीचा असेल. मूर्तीचे विसर्जन पाण्यात करणे. घरी देखील मोठ्या बादलीत पाणी घेऊन विसर्जन करता येईल. नंतर ती बादली काही दिवस झाकून ठेवावी व कालांतराने ते पाणी व माती आपल्या घराच्या परसात, कुंड्यांमध्ये, बागेत वापरून टाकावे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.