Ganeshotsav 2020: प्रश्न तुमचे, उत्तर पंचांगकर्ते दाते यांचे; पूजा करताना गोत्र माहीत नसल्यास काय करावे ?

घरामध्ये देवघरामध्ये आपण धातूच्या मूर्ती ठेवतो व त्यांची चल प्राणप्रतिष्ठापना केलेली असते. काही लोक घरात इतरत्र शोभेसाठी गणपतीच्या मूर्ती ठेवतात पण त्यांची आपण रोज पूजा करीत नसतो.

एमपीसी न्यूज- गणेशोत्सवात अनेक धार्मिक विधी केले जातात. त्याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. अनेकांच्या मनात अनेक प्रश्नं असतात. भाविकांना पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं खास ‘एमपीसी’च्या वाचकांसाठी सुप्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहेत. आजच्या भागात काही निवडक प्रश्नं पुढीलप्रमाणे…

1. 21 दूर्वा जोडीचा हार वाहणे, यासोबत अजून काही विशिष्ट अशी फुलं वाहवीत का ?

– गणपतीला दूर्वा आणि लाल रंगाची फुलं आवडतात असं सांगितलं जातं. त्यामुळे अशा फुलांना प्राधान्य द्यावे. मात्र पूजेमध्ये नेहमीच त्या त्या ऋतुमध्ये मिळणाऱ्या फुलांचा विशेष सुगंधी वनस्पतींचा समावेश करण्यास सांगितला आहे. त्यामुळे जी फुलं उपलब्ध असतील ती वाहावीत. या ऋतूमध्ये आघाडा सर्वत्र मिळतो तो वाहावा.

2. घरातील अन्य गणपतींच्या मूर्तीचं विसर्जन न करता केवळ याच दिवशी आणलेल्या मूर्तीचं विसर्जन का करतात?

– घरामध्ये देवघरामध्ये आपण धातूच्या मूर्ती ठेवतो व त्यांची चल प्राणप्रतिष्ठापना केलेली असते. काही लोक घरात इतरत्र शोभेसाठी गणपतीच्या मूर्ती ठेवतात पण त्यांची आपण रोज पूजा करीत नसतो. गणेशचतुर्थीच्या दिवशी आपण गणेशाची जी मूर्ती आणतो ती मातीपासून तयार केलेली असते. अशी मूर्ती खूप दिवस ठेवता येत नाही आणि हे पार्थिव गणेशाचं व्रत असल्याने त्याचं पाण्यात विसर्जन करायला सांगितलं आहे.

3. गणपतीची पूजा योग्यप्रकारे न झाल्यास गणपती रागावतो असा भीतीयुक्त समज आहे. यात किती तथ्य आहे? गणपतीची मूर्ती जरी प्रसन्न वाटत असली तरी मनात ही भीती का?

– आपण एखाद्या देवतेची पूजा करताना ती मनापासून व श्रद्धेनी करावी, मनापासून व श्रद्धापूर्वक पूजा करणाऱ्यांना अशी भीती वाटण्याचं कारण नाही. गणपती रागावतो या समजात काहीही तथ्य नाही.

पूजेच्या संकल्पामध्येच असे म्हणलेले असते की माझ्या ज्ञानाप्रमाणे, मला उपलब्ध असलेल्या पूजा साहित्यानुसार हे गणेशा मी तुझे पूजन करीत आहे असे म्हणलेले आहे. गणपतीच्या बाबतीत उजव्या सोंडेचा गणपती आणू नये असे अनेक गैरसमज आहेत. पण त्यात काहीही तथ्य नाही. आपण त्याचे विघ्नहर्ता म्हणजे विघ्नांचा नाश करणारा म्हणून पूजन करतो.

4. ज्यांना आपलं गोत्र माहीत नसेल त्यांच्यासाठी पूजा करताना काय उपाय योजना आहे?

– पूजेच्या संकल्पामध्ये गोत्रोच्चार करण्याची प्रथा आहे. मात्र काही वेळेस आपले गोत्र माहीत नसते अशा वेळेस काश्यप गोत्राचा उच्चार करण्यास सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.