Ganeshotsav News : गणेशोत्सवावर यंदाही निर्बंध, जाणून घ्या काय आहेत नियम

एमपीसी न्यूज – गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट कायम आहे. त्यामुळे गणेशोत्सवावर यंदाही निर्बंध लागू राहणार असून, राज्य सरकारने याबाबत नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी चार फूटांची, तर घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली निर्धारित केली आहे.

 सार्वजनिक गणेशोत्सव 2021 मार्गदर्शक सूचना

– गणेशोत्सवासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी महापालिका वा स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक असेल.

– कोरोनामुळे महापालिका वा स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपातच मंडप उभारण्यात यावा. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणं अपेक्षित असल्यानं भपकेबाज सजावट करणं टाळावं.

– सार्वजनिक गणेश मंडळातील मूर्तीची उंची 4 फूट आणि घरातील मूर्तीची उंची 2 फुटांपेक्षा जास्त नसावी.

– शक्य असल्यास गणेशमूर्तीऐवजी धातूच्या वा संगमरवरी मूर्तीचं पूजन करावं. शक्यतोवर घरच्या घरी मूर्तीचं विसर्जन करावं. ते शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्ती विसर्जित करावी.

– स्वच्छेने दिलेल्या देणग्याच स्विकाराव्यात. जाहिरातींमुळे गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती करण्याला प्राधान्यक्रम द्यावा.

– सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम वा शिबिरे घेण्याला प्राधान्य देण्यात यावं. स्वच्छतेबाबत जनजागृती करावी.

– राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध गणेशोत्सवातही कायम असतील. शिथिल केले जाणार नाहीत.

– आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्यात यावे.

– नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्किंग, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.

– गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

– आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नये. विसर्जन स्थळी करण्यात येणारी आरती घरीच करावी. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाणं टाळावं. चाळीतील आणि इमारतीतील गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नये.

– महापालिका, विविध मंडळं, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

– कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारसह, आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन यांनी ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करण्यात यावं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.