Ganeshostav 2020 : शेलार कुटुंबीयांनी साकारली हुबेहूब श्री राम मंदिराची प्रतिकृती

या मंदिराची उंची 5  फूट असून लांबी 6  फूट, रुंदी 4  फूट आहे. मंदिरासाठी 140 खांब उभारण्यात आले आहेत.

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच अयोध्येत श्री राम मंदिराचे भूमिपूजन झाले. यानंतर भारतासह संपूर्ण जगभरात रामभक्तांनी आनंदोत्सव साजरा केला. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथील शेलार कुटुंबीयांनी यंदा आपल्या घरगुती गणपतीची आरास करताना अयोध्येतील नियोजित प्रभू श्री राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. सोशल मीडियावर सध्या या मंदिराचा देखावा चर्चेचा विषय ठरला आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात राम मंदिराच्या प्रतिकृतींच्या देखाव्यांची चढाओढ पाहायला मिळाली असती. मात्र कोरोनामुळे यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने आणि कडक निर्बंधात साजरा होत आहे. असे असले तरी गणेशभक्तांचा उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळते.

यंदा सार्वजनिक गणेश उत्सवात देखावे व विद्युत रोषणाईला बगल दिली असली तरी घरगुती गणपती समोरील सजावटीवर कोरोना महामारीचा कोणताही परिणाम झालेला नाही.

अनेक गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांची आरास करताना कोणतीही कसूर सोडलेली नाही. शेलारवाडी येथील रहिवाशी आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या घरच्या गणपतीची आरासही पंचक्रोशीसह मावळ तालुक्यात मुख्य आकर्षण ठरली आहे. शेलार कुटुंबीयांनी यंदा अयोध्येतील नियोजित प्रभू श्री राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.

रघुवीर शेलार यांचे एकत्र कुटुंब आहे. या कुटुंबात एकूण 40  सदस्य आहेत. कुटुंबातील लहानथोर, तरुण तसेच महिलांनी मिळून राम मंदिराची प्रतिकृती साकारली. या देखाव्यासाठी घरातील जुने प्लायवूड, पुठ्ठे,  वायरिंगच्या कामासाठी वापरले जाणारे पाईप, ॲब्रॉ टेप, फेविकॉल आणि वॉटर बेस पेंटचा वापर करण्यात आला.

या देखाव्याची संकल्पना रघुवीर शेलार यांची आहे. तर देखावा उभारण्यात संदीप शेलार, मयूर शेलार यांचे सहकार्य लाभले. कुटुंबातील जेष्ठ उद्धवराव शेलार, दत्तात्रय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन महाराज शेलार, अक्षय शेलार, अमोल शेलार, अभिषेक शेलार,पुष्कर शेलार, दिनेश शेलार यांच्यासह कुटुंबातील सर्वच सदस्यांनी राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात हातभार लावला.

या मंदिराची उंची 5  फूट असून लांबी 6  फूट, रुंदी 4  फूट आहे. मंदिरासाठी 140 खांब उभारण्यात आले आहेत. मंदिराच्या तळमजल्यावर रामल्लाची प्रतिकृती आहे. पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार असून, दुसऱ्या मजल्यावर रंग मंदिर साकारण्यात आले आहे. या मंदिराला 4  कळस व 5  दरवाजे आहेत. एकूणच हा देखावा पाहताना अयोध्येतील नियोजित राम मंदिर डोळ्यासमोर उभे राहते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.