Talegaon News : ‘श्रीं’च्या मूर्तीचे घरीच विसर्जन करा किंवा मूर्ती दान करा’

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांचे आवाहन

एमपीसीन्यूज  : तळेगाव दाभाडे शहरातील सर्व घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन सार्वजनिक ठिकाणी न करता घरात निर्माण केलेल्या कृत्रिम हौदात करावे. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मंडपाच्या कृत्रिम हौदात करावे. कोणीही विसर्जन मिरवणूका काढू नये. त्याचबरोबर घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन घरीच करावे, शक्य नसल्यास गणेश मूर्ती दान करावी, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ तसेच घरगुती गणेश भक्तांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने करायचे ठरवल्याने कोणीही गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळून हा उत्सव साजरा करायचा आहे.

यंदाच्या गणेश मूर्ती विसर्जनाबाबत परिपत्रकात नियमावली दिली आहे. त्यानुसार विसर्जन मिरवणूका रद्द करण्यात आलेल्या आहेत.

गणेश मूर्ती विसर्जनाबाबत परिपत्रकातील नियमावली

सार्वजनिक गणेश मंडळातील श्रीची मूर्ती मंडपाच्या समोरच पाण्याची व्यवस्था करून विसर्जन करण्यात यावे.

घरगुती गणेश मूर्ती घरीच विसर्जीत कराव्यात किंवा मूर्ती दान करावी. मूर्ती दान करण्यापूर्वी विसर्जनाची आरती घरीच करावी.

नगरपरिषद प्रशासनाकडून तळेगाव दाभाडे येथिल गाव भागासाठी पै. विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुल येथे तर तळेगाव स्टेशन येथे फ्रेंडस् ऑफ नेचर्स यशवंत नगर या स्वयंसेवी संस्थेकडे मूर्ती दान स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

60 वर्षावरील व्यक्ती, मधुमेह, रक्तदाब, श्वसनाचे विकार किंवा कोणत्याही आजाराने बाधीत व्यक्ती तसेच लहान मुले यांनी विसर्जनासाठी येणे टाळावे.

तळ्यावर, नदीवर विसर्जन करणाऱ्यांवर होणार कारवाई

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन तळयावर किंवा नदीवर करू नये. जे नागरीक मूर्तीचे विसर्जन नदीवर किंवा तळयावर करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे

फ्लोरा सिटी मामासाहेब खांडगेनगर येथे विसर्जन कुंड

तळेगाव नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे यांनी फ्लोरा सिटी मामासाहेब खांडगेनगर येथे ‘श्री’च्या मूर्ती विसर्जनासाठी विसर्जन कुंड तयार केले आहे. या ठिकाणी नागरिकांनी विसर्जन करावे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर विसर्जनाला होणारी गर्दी टाळण्यासाठी याचे अनुकरण परिसरातील सर्व सोसायट्यांनी करावे, असे आवाहन खांडगे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.