सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Ganeshutsav 2020 : ‘दगडूशेठ गणपती’चे विसर्जन व सांगता मुख्य मंदिरातच होणार

एमपीसीन्यूज : गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसह अनेक मंडळांनी मंदिरामध्येच व ऑनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय यावर्षी घेतला. त्याला गणेशभक्तांचीही उत्तम साथ मिळत असून ऑनलाईन दर्शन घेणा-यांची संख्या मोठी आहे. विसर्जन व सांगता सोहळ्याला देखील गर्दी होऊ नये, याकरीता दगडूशेठ गणपती ट्रस्टने ‘श्रीं’चे विसर्जन मुख्य मंदिरातच करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यावतीने ट्रस्टच्या 128 व्या वर्षी सुरु उत्सवात इतिहासात पहिल्यांदाच यंदा असा निर्णय घेण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीला सूर्यास्ताच्या वेळी मुख्य मंदिरात दगडूशेठच्या ‘श्रीं’चे विसर्जन होणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अशोक गोडसे म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या या निर्णयाचे अनुकरण केवळ पुण्यातीलच नाही, तर महाराष्ट्रातील गणेश मंडळांनी करावे. गणेश मंडळांनी आपापल्या मंदिराच्या किंवा उत्सव मंडपाच्या परिसरात विसर्जनाची सोय करावी.

तसेच समस्त पुणेकरांनी व गणेशभक्तांनी देखील घराबाहेर न पडता घरीच विसर्जन करावे. यामुळे कोरोनाशी सुरु असलेली लढाई लवकर संपविणे शक्य होईल. नागरिक घराबाहेर न पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास देखील मोठी मदत होणार आहे. श्रीं च्या विसर्जनासोबत कोरोनाचेही विसर्जन होण्यास हातभार लागेल.

उत्सवकाळात देखील दगडूशेठ गणपती मंदिर बंद राहणार असल्याने मंडळाचे कार्यकर्ते देखील मंदिरात दर्शनासाठी जाणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी देखील मंदिराजवळ गर्दी करु नये. गणेशभक्तांनी घराबाहेर न पडता घरच्या घरीच ‘श्रीं’चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे.

ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

spot_img
Latest news
Related news