_MPC_DIR_MPU_III

Ganeshutsav2020 : विरोधक म्हणतात पालिका प्रशासनाकडून गणेशभक्तांच्या भावनांशी खेळ; सत्ताधारी म्हणतात राज्य सरकारचेच निर्बंध

दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाचे कोणतेही नियोजन केले नाही. शहरातील विसर्जन घाट बंद केले आहेत. विसर्जनाची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. प्रशासन नियोजनशून्य कारभार करत असून गणेशभक्तांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप पालिकेतील विरोधकांनी केला. तर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोनामुळे गणेशोत्सावाबाबत राज्य सरकारचेच निर्बंध आहेत. पालिका त्याची अंमलबजावणी करत आहे. शिवसेनेने पालिकेत आंदोलन करण्यापेक्षा राज्य सरकारकडून परवानगी आणावी, असे सत्ताधा-यांनी सुनावले.

_MPC_DIR_MPU_IV

पालिकेने विसर्जन घाटाची व्यवस्था केली नाही. त्यामुळे सांगा विसर्जन कुठे करायचे, असा सवाल करत शिवसनेने आज पालिकेसमोर आंदोलन केले होते. त्यापार्श्वभूमीवर ‘एमपीसी न्यूज’ने पालिकेतील पदाधिका-यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.

गर्दी होऊ नये यासाठी घाट बंद ठेवले – महापौर ढोरे

महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, ”गर्दी होऊ नये यासाठी घाट बंद ठेवले आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्याला कोण जबाबदार राहणार. तरीपण, प्रभागनिहाय विसर्जन हौद ठेवले जात आहेत. मूर्तीदान घेतले जात आहे. फक्त नदीत विसर्जनाला परवानगी देण्यात येणार नाही. गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे”.

शिवसेनेने आंदोलन करण्यापेक्षा राज्य सरकारकडून परवानगी आणावी – ढाके

सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, ”कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. आम्ही नगरसेवक प्रभागात विसर्जनाची सोय करत आहोत. पालिका आठही क्षेत्रीय कार्यालयात सामाजिक संस्थामार्फत मूर्तीदान उपक्रम राबविणार आहे.

गणेशोत्सावावर निर्बंध राज्य सरकारने घातले आहेत. पालिका प्रशासन त्याची अंमलबजावणी करत आहे. कोरोनामुळे निर्बंध घातले आहेत याचे आम्हाला भान आहे. त्यामुळे त्यावरुन आम्ही राजकारण करत नाही. शिवसेनेने कोरोनाच्या काळात राजकारण करणे योग्य नाही. पालिकेत आंदोलन करण्यापेक्षा राज्य सरकारकडून परवानगी आणावी.

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नुमना पुन्हा एकदा समोर – काटे

विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, ‘घरातच गणपती बसवा व घरातच विसर्जन करा’, असे आवाहन पालिकेमार्फत केले. परंतु, हेच आवाहन गणपती येण्याअगोदर पाच दिवस केले असते तर नागरीकांनी कमी उंचीच्या व प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्त्या न आणता शाडूच्या मूर्त्या आणल्या असत्या.

नागरिकांनी प्लॉस्टर ऑफ पँरीसच्या मूर्त्या आणल्या आहेत. त्या पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे मुर्तींची विटंबना होऊन नागरीकांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नुमना पुन्हा एकदा समोर आलेला आहे. पुढील पाच, सात आणि नऊ दिवस व अनंत चर्तुथी या विसर्जन दिवशी शहरातील भक्तांच्या भावनांशी न खेळता गणेश विसर्जनांसाठी पुणे पालिकेच्या धर्तीवर फिरत्या हौदाची संकल्पना प्रभाग स्तरावर राबविण्यात यावी.

पालिकेकडून राज्य सरकारच्याच नियमावलीचे पालन – शिवसेना गटनेते कलाटे

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ”कोरोनामुळे गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्नारे प्रशासनाला सूचना, नियमावली दिली आहे. त्या सूचनांनुसार प्रशासन काम करत आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे.

काळजी म्हणून घरातल्या गणपतीचे घरातच विसर्जन करावे. गृहनिर्माण सोसायट्यांनी सोसायट्यांमध्येच विसर्जन करावे, अशा सरकारच्या सूचना आहेत. त्या आदेशाचे पालन करत असल्याचे प्रशासनाने मला सांगितले आहे. आत्ताच्या घडीला प्रत्येकाने आपली काळजी घेणे आवश्यक आहे”.

पालिकेने फिरते हौद ठेवणे आवश्यक होते – चिखले

मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, ”कोरोनाचा काळ भीषण आहे. तरीपण पालिकेने सुरक्षित अंतराची खबरदारी घेत सार्वजनिक नाही पण, प्रभागातील घाट, फिरते हौद ठेवणे आवश्यक होते. पुणे पालिकेने फिरते हौंद ठेवले आहेत. निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली आहे.

त्याचधर्तीवर पिंपरी पालिकेनेही करणे गरजेचे होते. जेणेकरुन सर्वसामान्य नागरिक बाहेर पडले नसते. प्रशासनाने व्यवस्था केली नसल्याने मी प्रभागात हौद, निर्माल्य संकलानाची व्यवस्था करणार आहे”.

पालिका प्रशासनाकडू गणेशभक्तांच्या भावनांशी खेळ – शिवसेना जिल्हाप्रमुख चिंचवडे

कोरोनाचा काळ असतानाही पालिकेने गणेशोत्सवाचे नियोजन केले नाही. पालिका प्रशासनाकडून अतिशय गलथान कारभार सुरु आहे. विसर्जन घाट पत्रे लावून बंद केले आहेत. शहरात फिरत्या हौदाची कोठेही व्यवस्था नाही.

दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना नागरिकांचे प्रचंड हाल झाले. स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने मूर्तीदान उपक्रम देखील राबविला नाही. नियोजनाचा संपूर्ण अभाव आहे. पालिका गणेशभक्तांच्या भावनांशी खेळत असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी केला.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.