Gautam Pashankar Missing Case : गौतम पाषाणकरांचे काय झाले ? महिनाभरानंतरही तपास नाही

एमपीसीन्यूज : पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक गौतम पाषाणकर 21 ऑक्टोबरपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणाला आता एक महिना होत आला आहे. तरीही अजून त्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे पाषाणकर यांचे नेमके काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी ते कोल्हापुरात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांचा तपास सुरू केला असून त्यातून ही माहिती मिळाली.

परंतु, ते कोल्हापुरात नेमके कुठे आहेत याची माहिती मात्र पोलिसांकडे नव्हती. त्यामुळे ते कोल्हापुरातच आहे किंवा आणखी इतर कुठे गेलेत याचा शोध मात्र लागला नाही.

गौतम पाषाणकर यांचे 21 ऑक्टोबरच्या आधीचं व्हाट्सअपवरील चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले आहे. त्याआधारेही पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

पाषाणकर हे पाषाणकर ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते बांधकाम व्यवसायिकही आहेत. 21 ऑक्टोबर रोजी त्यांनी मोटार चालकाला एक लिफाफा ताब्यात देऊन घरी देण्यास सांगितला. त्यानंतर त्यांनी चालकाला ‘तुझे काही काम असेल तर करून ये’, असे सांगत ‘मी पायी घरी येतो’, असे सांगितले.

त्यानुसार चालकाने तो लिफाफा घरी दिला. पाषाणकर कुटुंबियांनी तो लिफाफा उघडून पहिला असता त्यात गौतम यांनी व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर पाषाणकर कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.