Chinchwad : मनात असते तसेच सारे घडते का हो? म्हणून कोणी चूक बरोबर ठरते का हो?’

गझल पुष्प पिंपरी-चिंचवड कार्यक्रमात श्रोते झाले मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – मनात असते तसेच सारे घडते का हो? म्हणून कोणी चूक बरोबर ठरते का हो?’, असे मनातून मनापर्यंत पोहोचणारे प्रश्न रसिकांना विचारत गझलकार निलेश शेंबेकर यांनी मुशायरा एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवला.

‘जिथे जातो तिथे माझा मला गतकाळ आठवतो
मला सुचल्या जिथे गझला सुना तो माळ आठवतो’

अशा आठवणींच्या कल्लोळात घेऊन जाणारा माहौल निर्माण करत रसिकांना भूतकाळाच्या गंधामध्ये गुंतवून ठेवणारी अतिशय भावूक गझल गझलकार सचिन काळे यांनी सादर केली. निमित्त होते गझलपुष्प पिंपरी-चिंचवड या अल्पावधीतच राज्यस्तरावर नावाजलेल्या संस्थेच्या द्वितीय वर्षातील प्रथम मराठी गझल मुशाय-याचे. उद्योजक अभय पोकर्णा व निवृत्त प्राधिकरण अभियंता अनिल सुर्यवंशी यांच्या हस्ते शमा प्रज्वलित करून मुशाय-याला प्रारंभ करण्यात आला.

‘घ्यावी म्हणते मी ही थोडी झेप अंबरी आनंदाने
पाणवठ्यावर भरते ना मी रित्या घागरी आनंदाने’

अशी स्त्री वादी रचना व अंबरी झेपावण्याची आश्वासकता मीना शिंदे यांनी आपल्या गझलेतून सादर केली. प्रेम विरह, सामाजिक, तत्वज्ञान, अध्यात्मिक अशा विविधरंगी गझलांचे इंद्रधनुष्य गझलकारांकडून रसिकांना समर्पित करण्यात आले. अगदी थंडीची हुडहुडी देखील गझलकारांच्या मध्यभागी प्रज्वलित झालेल्या शमेपुढे व गझल सादरीकरणाने जाणवली नाही.

‘एक तारा मी नव्याने पाहिल्यावर अंबरी
माय दिसते हाच नंतर भास झाला सारखा’
– नंदकुमार मुरडे

‘फसला विकास आहे
लोकांस त्रास आहे ‘
– बी. एस. बनसोडे

‘सत्य अहिंसा दौलत आहे ही देशाची
मानवतेच्या तत्वासाठी जागर आहे’
– अशोक कोठारी

यांनीही बहारदार रचना सादर केल्या. चिंचवड गावातील सिल्व्हर गार्डनमधील खुशबू बंगल्यातील या रंगतदार मैफिलीचा सुगंध दोन तास दरवळत राहिला. समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्षा शोभा जोशी यांच्या पंचाहत्तरी निमित्त त्यांना अभय पोकर्णा, मीना पोकर्णा व गझलपुष्प समुहाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

तसेच यावर्षीचा दिवंगत गझलकार अरुणोदय भटकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘उत्कृष्ट गझल समीक्षक गझलपुष्प पुरस्कार’ ज्येष्ठ गझल समीक्षक सुनिल देवधर यांना जाहीर करण्यात आला व तो 8 मार्च 2020 रोजी गझलपुष्प आयोजित राज्यस्तरीय महिला गझल मुशाय-यामध्ये प्रदान करण्यात येईल. अभिजीत काळे, संदीप जाधव, प्रशांत पोरे, समृद्धी सुर्वे, सारिका माकोडे, रघुनाथ पाटील, दिनेश भोसले यांनी उत्कृष्ट संयोजन केले तर या बहारदार मैफिलीचे सूत्रसंचालन मीना शिंदे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.