Geneva: कोरोना अजून बराच काळ आपल्या सोबत राहणार आहे, गाफील राहू नका, ‘डब्ल्यूएचओ’चा इशारा

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू अजून बराच वेळ आपल्या सोबत राहणार आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.  अनेक देश अद्यापही करोनाशी लढा देण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत. जे देश आपण करोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत होते तिथे संख्या वाढत चालली आहे. तसेच आफ्रिका आणि अमेरिकेतही चिंताजनक वाढ झाली आहे, याकडे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी लक्ष वेधले आहे. गाफील राहू नका, कोणतीही चूक करू नका, असेही त्यांनी सर्व देशांना बजावले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य विभागाने अत्यंत योग्य वेळी 30 जानेवारी रोजी जागतिक आणीबाणी जाहीर केली होती. यामुळे अनेक देशांना तयारी करण्यासाठी तसेच कोरोनाशी लढा देण्यासाठी योजना तयार करण्यासाठी वेळ मिळाला आहे, असे टेड्रोस यांनी म्हटले आहे. कोरोनासंबंधी परिस्थिती योग्य हाताळली नसल्याचा आरोप अमेरिका सातत्याने जागतिक आरोग्य संघटनेवर करत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

_MPC_DIR_MPU_II

पश्चिम युरोपमध्ये परिस्थिती स्थिर किंवा ढासळत असल्याचे पहायला मिळत आहे. संख्या कमी असली तरी आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका तसेच पश्चिम युरोपमध्ये चिंता वाढवणारी परिस्थिती आहे, असे टेड्रोस म्हणाले. अनेक देश सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. आणि ज्यांना आधीच फटका बसला आहे तिथे संख्या वाढत चालली असल्याचे दिसत आहे, याकडे टेड्रोस यांनी लक्ष वेधले.

कोणत्याही देशाने गाफील राहू नये, कोणतीही चूक करु नये. आपल्याला अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. हा विषाणू आपल्यासोबत बराच काळ असणार आहे, असा इशारा टेड्रोस यांनी दिला आहे. मागे वळून पाहिले असता आम्ही अत्यंत योग्य वेळी जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली असे वाटते. सर्वांनाच तयारी करण्यासाठी खूप वेळ मिळाला, असा दावा देखील त्यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.