Geneva: ‘कोरोनाचा सर्वात वाईट प्रकोप तर पुढेच आहे’, ‘डब्ल्यूएचओ’ महासंचालकांनी दिला इशारा

एमपीसी न्यूज – ‘कोरोनाचा सर्वात वाईट प्रकोप तर पुढेच आहे’, या शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी जगाला येणाऱ्या संकटाचा इशारा दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने अनेक देशांनी लॉकडाऊन सारखे प्रतिबंध शिथिल केल्यामुळे हा धोका अधिक वाढला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनिव्हा येथील मुख्यालयात टेड्रोस पत्रकारांशी बोलत होते. कोरोना विषाणू जगभरातील 25 लाख लोकांपर्यंत संक्रमित झाला असून त्याने आतापर्यंत एक लाख 66 हजारपेक्षा अधिक बळी घेतले आहेत. तो आणखी कसा विध्वंस करू शकेल, याबाबत टेड्रोस यांनी स्पष्ट सांगितले नाही. मात्र, अफ्रिकेसारख्या वैद्यकीय पायाभूत सुविधा कमी असलेल्या भागात कोरोनाचा प्रसार धोकादायक ठरू शकतो, याकडे त्यांनी यापूर्वी लक्ष वेधले होते.

‘आमच्यावर विश्वास ठेवा. सर्वात वाईट प्रकोप पुढेच आहे,’ या सूचक विधानाचा त्यांनी पुनरुच्चार केला.  ‘चला ही शोकांतिका रोखूयात. हा एक विषाणू आहे जो बर्‍याच लोकांना अजूनही समजत नाही’, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. काही आशियाई आणि युरोपियन सरकारांनी कोविड-19 चे रुग्ण घटल्याचे व मृत्यू घटल्याचे कारण देत क्वारंटाईन, शाळा आणि व्यवसाय बंद आणि सार्वजनिक संमेलनावरील निर्बंध यासारख्या ‘लॉकडाउन’च्या उपायांना हळूहळू शिथिल करण्यास किंवा पूर्णपणे उठविण्यास सुरवात केली आहे. ही बाब चिंता वाढविणारी आहे, असे ते म्हणाले.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना टेड्रोस म्हणाले की, ‘डब्ल्यूएचओमध्ये कोणतेही रहस्य नाही कारण गोष्टी गोपनीय किंवा गुप्त ठेवणे धोकादायक आहे. ही आरोग्याची समस्या आहे’

कोरोना विषाणूच्या उद्रेकाला जागतिक आरोग्य संघटनेने सुरूवातीला गांभीर्याने घेतले नाही, असा आरोप करीत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘डब्ल्यूएचओ’ला अमेरिकेकडून दिला जाणारा निधी थांबविण्याचा निर्णय घेतला. अमेरिका हा ‘डब्ल्यूएचओ’चा सर्वात मोठा देणगीदार असल्याने अमेरिकेच्या या निर्णयामुळे टेड्रोस व जागतिक आरोग्य संघटनेने बचावात्मक पावित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर झालेल्या डब्ल्यूएचओ ‘वेळेवर आणि पारदर्शक माहिती’ पुरेशी प्रमाणात सांगण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ट्रम्प यांनी ठेवला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.