Geneva: डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वीकारली WHO च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे

Geneva: Dr. Harsh Vardhan took the charge as the Chairman of the Executive Board of the World Health Organisation सार्वजनिक आरोग्याच्या जबाबदाऱ्या कार्यक्षम, प्रभावी आणि प्रतिसादी पद्धतीने पार पाडण्यासाठी वचनबद्ध : डॉ. हर्ष वर्धन

एमपीसी न्यूज – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची वर्ष 2020-21 साठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यकारी मंडळाच्या 147 व्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. हर्ष वर्धन यांनी जपानच्या डॉ. हिरोकी नकतानीची जागा घेतली आहे. जग कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत असताना ही आव्हानात्मक जबाबदारी डॉ. हर्ष वर्धन यांच्या खांद्यावर आली आहे. 

कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाचा स्वीकार करताना डॉ. हर्ष वर्धन यांनी जागतिक कोविड-19 साथीच्या आजारामुळे बळी गेलेल्या लाखो लोकांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांना, सर्व आघाडीचे आरोग्य सेवा कर्मचारी आणि इतर कोविड योद्धयांना त्यांच्या सन्मान, दृढनिश्चय आणि समर्पणासाठी उभे राहून सलाम करण्याची विनंती केली.

“तुमच्या सर्वांचा विश्वास पाहून मला अभिमान वाटत आहे. हा सन्मान आम्हाला प्राप्त झाला आहे ही भारत आणि माझ्या सर्व देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे”, असे ते म्हणाले.

कोविड सारख्या महामारी ही एक मोठी मानवी शोकांतिका आहे हे कबूल करत आणि पुढील दोन दशके अशी अनेक आव्हाने आपण पाहू शकतो, असे त्यांनी नमूद करत ते म्हणाले की, “या सर्व आव्हानांना एकत्रित प्रतिसाद देणे गरजेचे आहे कारण हे सर्व सामायिक धोके आहेत ज्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी संयुक्त जबाबदारी उचलणे आवश्यक आहे.”

ते पुढे म्हणाले की, “WHO चा समावेश असलेल्या आमच्या सदस्य राष्ट्रांच्या आघाडीचे हे मूळ तत्वज्ञान असले तरी, त्यास राष्ट्रांच्या सामायिक आदर्शवादाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.”

‘सार्वजनिक आरोग्यासाठी जागतिक भागीदारी महत्त्वाची’

ते म्हणाले, “या साथीच्या रोगाने आपल्या आरोग्य सेवा व्यवस्थेचे मजबुतीकरण आणि तत्परतेकडे दुर्लक्ष करण्याच्या परिणामाची मानवतेला सखोल जाणीव झाली आहे. जागतिक संकटाच्या अशा काळात, जोखीम व्यवस्थापन आणि त्याच्या उपशमन या दोहोंसाठी जागतिक सार्वजनिक आरोग्यामध्ये उत्साह आणि गुंतवणुकीस पुन्हा चालना देण्यासाठी जागतिक भागीदारी आणखी मजबूत करणे आवश्यक आहे. ”

डॉ.हर्ष वर्धन यांनी देखील कोविड-19 विरुद्धच्या लढाईतील भारताचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, “आमचा मृत्यू दर केवळ 3 टक्के आहे. 1.35 बिलियन लोकांच्या देशात, कोविड-19 ची केवळ 0.1 दशलक्ष प्रकरणे आहेत. रुग्णांचा बरा होण्याचा दर 40 टक्क्यांहून अधिक असून कोरोना संसर्ग दुप्पट होण्याचा दर हा 13 दिवसांचा आहे. ”

WHO च्या कार्यकारी मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून, डॉ. हर्ष वर्धन यांनी शतकानुशतके मानवजातीला ग्रासलेल्या रोगांच्या संदर्भात उच्च प्रतिबद्धतेची गरज, जागतिक स्त्रोतांच्या माध्यमातून एकमेकांना पूरक बनविण्याचे सहकार्य, समूळ उच्चाटन शक्य असणाऱ्या रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंना आळा घालण्यासाठी एक आक्रमक मार्ग शोधणे, औषधे आणि लसींची जागतिक कमतरता आणि सुधारणांची आवश्यकता यावर उपाय म्हणून नवीन मार्ग तयार करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

“मला खात्री आहे की सदस्य देश आणि इतर भागधारकांशी सातत्याने या दिशेने काम केल्यास सुधारणांना बळकटी मिळेल आणि शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आणि स्रोतांचा अत्यंत उत्पादक, कार्यक्षम आणि लक्ष्यित वापर करून सार्वत्रिक आरोग्य प्राप्त करण्याच्या प्रगतीला चालना मिळेल. आपल्या संघटनेची सामूहिक दृष्टी साकार करण्यासाठी, आपल्या सर्व सदस्य देशांची सामूहिक क्षमता वाढविण्यासाठी आणि एक सामूहिक नेतृत्व निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.” असे ते म्हणाले.

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, WHO या तत्त्वावर विश्वास ठेवतो की उच्चतम प्राप्ती योग्य आरोग्याचा दर्जा हा कोणत्याही जाती, धर्म, राजकीय श्रद्धा, आर्थिक किंवा सामाजिक दर्जाचा विचार न करता मानवाच्या मूलभूत अधिकारांपैकी एक आहे. “म्हणूनच, आम्ही सार्वजनिक आरोग्य जबाबदाऱ्या कार्यक्षम, प्रभावी आणि प्रतिसादात्मक पद्धतीने पार पाडण्यासाठी सदस्य देश, संघटना आणि भागीदारांच्या जागतिक समुदायाबरोबर काम करण्याचे वचन देतो”, असे ते म्हणाले.

‘आर्थिक विकास व मानवी क्षमता वाढीसाठी आरोग्य केंद्रस्थानी’

डॉ. हर्ष वर्धन यांनी भविष्यातील आरोग्याच्या परिस्थितीवर आपले विचार मांडले. “माझा असा विश्वास आहे की, आरोग्य ही आर्थिक कामगिरी आणि मानवी क्षमता वाढवण्यामध्ये केंद्रस्थानी आहे. तथापि, सार्वजनिक आरोग्य धोरण निसर्गाच्या योग्य आकलनावर आधारित आणि मार्गदर्शित असले पाहिजे. हे देखील सर्वांगीण आरोग्य आणि निरोगीपणावर आधारित पारंपारिक भारतीय औषध प्रणालीचे मुलभूत तत्व आहे जे मी जगलो आहे आणि अनुभवले आहे”, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तडफदार नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्र (HWC) आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) हे दोन मुख्य स्तंभ असलेल्या आयुष्मान भारत सारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘सर्वांसाठी आरोग्य’ या दिशेने कार्यरत असलेले भारताचे धोरण देखील त्यांनी अधोरेखित केले.

WHO सोबत असलेल्या त्यांच्या दीर्घकालीन सहकार्याचे स्मरण करताना त्यांनी भारताच्या पोलिओ विरुद्धच्या लढाईत WHO च्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “जर WHO मधील मित्रांकडून पाठिंबा मिळाला नसता आणि त्यांनी मनोबल वाढविले नसते तर मी जे केले ते साध्य करणे शक्य नव्हते. आज जर पोलिओचे भारतातून उच्चाटन झाले आहे तर मी हे कबूल केलेच पाहिजे की WHO च्या चिकाटीशिवाय हे कधीच शक्य झाले नसते”.

कोण आहेत डॉ. हर्ष वर्धन?

डॉ. हर्ष वर्धन पोलिओ निर्मूलन विषयक तज्ञांचा धोरणात्मक सल्लागार गट (एसएजी) आणि जागतिक तांत्रिक सल्लागार गट (टीसीजी) या सारख्या अनेक प्रतिष्ठित समित्यांचे सदस्यही आहेत. त्यांनी WHO चे सल्लागार म्हणूनही काम केले आहे.

WHO चे कार्यकारी मंडळ तीन वर्षांच्या मुदतीसाठी निवडलेल्या 34 तांत्रिकदृष्ट्या पात्र सदस्यांसह बनलेले आहे. आरोग्य परिषदेचे निर्णय व धोरणांची अंमलबजावणी करणे आणि त्यासंदर्भातील सल्ला व सुविधा सुलभ करणे ही मंडळाची मुख्य कार्ये आहेत.

डॉ. हर्ष वर्धन यांच्या नेत्रदीपक कारकिर्दीत हा आणखी एक मानाचा तुरा आहे. त्यांनी GSVM वैद्यकीय महाविद्यालयातून अनुक्रमे 1979 आणि 1983 मध्ये वैद्यकशास्त्र विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. 1993 मध्ये ते दिल्ली विधानसभेवर निवडून आल्यापासून सार्वजनिक सेवेत कार्यरत आहेत. मे 2014 मध्ये चांदणी चौक मतदार संघातून 16 व्या लोकसभेवर निवडून येईपर्यंत त्यांनी पाच वेळा सातत्याने आपल्या मतदार संघात काम केले. 1993 ते 1998 पर्यंत त्यांनी दिल्लीच्या NCT सरकारचे आरोग्य, शिक्षण, कायदा आणि न्याय आणि विधिमंडळ मंत्री म्हणून काम पाहिले. 1994 मध्ये दिल्लीचे आरोग्यमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी पल्स पोलिओ कार्यक्रमाच्या प्रायोगिक प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीवर देखरेख केली ज्यामध्ये दिल्लीत 3 वर्षांपर्यंतच्या 1.2 दशलक्ष मुलांना मोठ्या प्रमाणात लस पाजण्यात आली आणि त्यांनी 2014 मध्ये पोलिओमुक्त भारताची पायाभरणी केली. त्यांनी दिल्ली धुम्रपान प्रतिबंध आणि धुम्रपान न करणाऱ्यांच्या आरोग्य संरक्षण कायदा 1997 पारित करून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली, यानंतर देशातील अनेक राज्यांनी हा कायदा आपल्या राज्यांमध्ये लागू केला.

डॉ हर्षवर्धन 2014 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून कार्यरत होते आणि नंतर त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. ते केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री देखील होते. ते 17 व्या लोकसभेवर पुन्हा निवडून गेले आणि 30 मे, 2019 रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण; विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.