Corona Update : कोरोना लस बाबत माहिती देणारं भारत सरकारचं अ‍ॅप तयार

एमपीसी न्यूज :  कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गावर मात करण्यासाठी सगळेच देश लस निर्मितीच्या कामात गुंतले आहेत. अशात लस (Vaccine) उत्पादक कंपनी भारत बायोटेकने (Bharat Biotech) सोमवारी कोव्हिड – 19 संसर्गावर मात करणाऱ्या भारतातील पहिल्या देशी लसीची म्हणजेच ‘कोव्हॅक्सिन’ची (covaxin) तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू केली असल्याची घोषणा केली.

फेज-3 चाचणीमध्ये संपूर्ण भारतातील 26,000 स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. याचप्रमाणे देशातील इतर ठिकाणीदेखील कोरोनावरील लस बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच कोरोनावरील लस देशात उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कोरोनावरील लसीबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारने एक खास अॅप तयार केलं आहे. कोव्हिन (Covin App) असं या अ‍ॅपचं नाव आहे. हे अ‍ॅप तुम्हाला कोरोना लसीचा साठा, त्याचे वितरण, स्टोरेज याबाबतची माहिती देईल. ही लस जेव्हा दिली जाईल, तेव्हा त्याचे वेळापत्रकही कोव्हिन अ‍ॅपवर उपलब्ध होईल. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला देशभरातील 28 हजार स्टोरेज सेंटरमधील लसींच्या साठ्याविषयची माहिती मिळेल.

कोरोना व्हॅक्सिनचा साठा करुन ठेवलेल्या जागेवरील तापमानावरही कोव्हिन अॅपचं लक्ष असेल, या अॅपद्वारे साठा करुन ठेवलेल्या जागेवरील तापमानात होणाऱ्या बदलांबाबतची माहिती मिळेल. दरम्यान, तुम्हाला लस कधी दिली जाणार आहे, याबाबतची माहितीदेखील या अ‍ॅपद्वारे नागरिकांना मिळेल. तसेच तुम्हाला लस दिल्यानंतर त्याचं प्रमाणपत्रदेखील या अ‍ॅपद्वारे तुम्हाला दिलं जाणार. तुम्हाला लस दिल्यानंतर आपोआप या अॅपमध्ये संबंधित प्रमाणपत्र जनरेट होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.