Mumbai: तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी व्हा पुन्हा एकदा सज्ज, कौन बनेगा करोडपतीचे रजिस्ट्रेशन सुरू!  

एमपीसी न्यूज – ‘सपने मे मिलती है’, ‘मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू’, ‘सपना मेरा टूट गया’ ही गाणी स्वप्नांवरील आहेत हे लक्षात येतंय ना? स्वप्न पाहायला कोणाला आवडत नाही ? लहानांपासून मोठ्यांपर्यत प्रत्येकजण स्वप्नच पाहात असतो. या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचे काम केले ते सोनी टीव्हीवरील एका रिअॅलिटी शोने. मी एवढी प्रस्तावना केल्यावर तो शो कोणता ते एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. करेक्ट… ‘कौन बनेगा करोडपती’ हा तो शो, ज्याने लोकांच्या स्वप्नांना बळ दिलं. साध्यासुध्या माणसाला मोठ्ठी स्वप्नं पाहून जगायला शिकवलं.

हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे  ‘कौन बनेगा करोडपती.’ या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ‘सदी का महानायक’ असे बिरुद मिरवणारे अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन या कार्यक्रमाची धुरा सांभाळत आहेत. आजवर या शोचे 11 पर्व झाले असून ‘बिग बीं’नी यात सूत्रसंचालकाची जबाबदारी अगदी समर्थपणे आपल्या खांद्यांवर पेलली आहे.  एक पर्व संपून दुसरे पर्व कधी सुरु होणार याची कायम प्रेक्षकांना उत्सुकता असते. त्यामुळे 12 वे पर्व कधी सुरु होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. तर हे 12 वे पर्व लवकरच सुरु होणार असल्याची घोषणा बिग बींनी एका व्हिडिओद्वारे केली आहे.  या नव्या पर्वासाठी नावनोंदणीही सुरु झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सोनी टीव्हीने ‘कौन बनेगा करोडपती’चा एक नवा प्रोमो व्हिडीओ शेअर केला असून त्यात अमिताभ बच्चन 12 व्या पर्वाची घोषणा करताना दिसून येत आहेत. त्यामुळे केबीसी 2020 मधील नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असल्याचं लक्षात येत आहे.

‘जिथे सगळं बंद आहे तिथे अशी एक गोष्ट आहे जी कधीच बंद होऊ शकत नाही. ते म्हणजे स्वप्न. चहापासून रेल्वे गाडीपर्यंत सगळ्याला ब्रेक लागू शकतो. पण तुमच्या स्वप्नांच्या उंच भरारीला नाही. याच स्वप्नांना उंच भरारी घेता यावी यासाठी केबीसी पुन्हा सुरु होत आहे. ९ मे पासून रात्री ९ वाजल्यापासून नव्या पर्वासाठी नावनोंदणी सुरु करण्यात येत आहे’, असं या व्हिडीओमध्ये बिग बी सांगत आहेत.

दरम्यान, ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो २००० सालापासून सुरु आहे. आजपर्यंत या शोने अनेकांना कोट्यधीश केलं आहे. या शोचा पहिला करोडपती मराठमोळा हर्षवर्धन नवाथे होता. त्यानंतर काही भागांमध्ये अनेक दिग्गजांनी हजेरीही लावलेली आहे. आपली स्वप्ने साकार करण्यासाठी प्रेक्षक पुन्हा एकदा या नवीन पर्वात मोठ्या उत्साहाने सामील होतील एवढे मात्र नक्की.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.