Talegaon Dabhade: अनुकूल परिस्थितीतही संघटनवाढीसाठी काम केले पाहिजे- संदीप जाधव

एमपीसी न्यूज- सध्याच्या परिस्थितीत आपल्याला अनुकूलता जाणवत असली तरी त्यामुळे दुष्परिणामही सोबत येत असतात. प्रतिकूल परिस्थितीत आपण काम करतो, त्याचप्रमाणे अनुकूल परिस्थितीतही संघटन वाढवण्यासाठी काम केले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र तरुण व्यवसायी विभाग सहप्रमुख संदीप जाधव यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तळेगाव दाभाडे मंडलाने आयोजित केलेल्या दीपावली स्नेह मीलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य अशोककुमार बेरी, पुणे जिल्हा कार्यवाह अविनाश भेगडे, मावळ तालुका कार्यवाह हेमंत दाभाडे उपस्थित होते.

जाधव म्हणाले की, भारतीय संस्कृती अंधश्रद्धा, अज्ञानी, अनिष्ट रूढी यांनी ग्रासलेली आहे, अशी टीका जाणीवपूर्वक अनेक वर्षांपासून लोकांच्या मनावर बिंबवली जात असून त्याद्वारे संस्कृतीबद्दल दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मानसिक गुलामगिरी मधून बाहेर पडण्याची गरज आहे. हिंदू व मुस्लिम यातील सौहार्दाचे वातावरण जाणीवपूर्वक बिघडवून अशांतता निर्माण केली जात आहे.

देशाची  संस्कृती आपली असून त्यातील चांगल्या- वाईट गोष्टी आपल्या असून त्यात सुधारणा करणे आपलेच काम आहे. जो देशात राहतो तो हिंदू, अशी संघाची सुटसुटीत व्याख्या आहे. हिंदू समाजाने कधी कोणावर धार्मिक आक्रमण केले नाही. दैनंदिन जीवनात पाश्चिमात्य अनुकरण करण्यापेक्षा आपल्या संस्कृतीमधील गोष्टी जतन केल्या पाहिजेत, असे मत जाधव यांनी व्यक्त केले.

समाजाला आपण जे देणे लागतो त्यात आपण काय योगदान देवू शकतो याचा विचार झाला पाहिजे आणि त्यानुसार कृती करणे गरजेचे आहे, असे जाधव म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.