Pimpri : ..म्हणून घरकुलाच्या नामांतराला स्थानिकांचा विरोध

फेडरेशन ऑफ घरकुलतर्फे एक दिवसीय निषेध सभा, 'घरकुल नवनगर संकल्प' नाव देण्याची मागणी

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या घरकुलाचे नामांतर करुन भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचे विचाराधीन आहे. परंतु, नामांतराला स्थानिकांनी विरोध केला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी आम्हा घरकुलवासियांना नितांत आदर आहे. तथापि, भविष्यात या नावावरुन वादविवाद, जातीपातीचे राजकारण होऊ शकते. सलोख्याचे वातावरण दूषित होऊ शकते. त्यामुळे जातीपातीशी निगडीत व्यक्तीचे नाव न देता ‘घरकुल नवनगर संकल्प’ असे सर्वसमावेशक नाव देण्यात यावे, अशी मागणी घरकुलवासियांनी यावेळी केली.

नामांतरला विरोध करण्यासाठी आज रविवारी (दि.20) फेडरेशन ऑफ घरकुलच्या वतीने निषेध सभा आणि एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जेएनएनयूआरएम अंतर्गत चिखली येथे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे. 160 इमारती उभारुन सहा हजार 720 सदनिका बांधल्या जाणार आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 124 इमारतींची उभारणी झाली असून त्यामध्ये पाच हजार 208 लाभार्थी राहत आहे. उर्वरित प्रकल्पाचे काम सुरु असून हा प्रकल्प ‘घरकुल’ या नावाने ओळखला जातो.

या प्रकल्पाचे नामांतरण करण्याचे सत्ताधारी भाजपच्या विचाराधीन आहे. घरकुल प्रकल्पाचे ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडेनगर’ करण्याचा विचार आहे. परंतु, या नामकारणाला घरकुलवासियांनी विरोध दर्शविला आहे. घरकुलवासियांना विश्वासात न घेता नामांतरणाचा घाट घातला जात आहे. ही एकाधिकारशाही आहे. फेडरेशन आणि घरकुल धारकांना गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी नितांत आदर आहे. परंतु, भविष्यात या नावावरुन वादविवाद, जातीपातीचे राजकारण होऊ शकते. सलोख्याचे वातावरण दूषित होऊ शकते. त्यामुळे जातीपातीशी निगडीत व्यक्तीचे नाव न देता ‘घरकुल नवनगर संकल्प’ असे सर्वसमावेशक नाव देण्यात यावे, अशी मागणी घरकुलवासियांनी केली आहे.

याबाबत महापौर, आयुक्त, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, ‘फ’ प्रभाग अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे.

जाती-धर्मातील विविधतेत नटलेल्या या घरकुल संकुलामध्ये सलोखा-बंधुता-एकता आणि राष्ट्र एकात्मता कायमस्वरुपी टिकवून रहावी. शांतता नांदावी, लोकशाही विरोधी राजकारण्यांना जाब विचारण्यात यावा, यासाठी फेडरेशन ऑफ घरकुलतर्फे येत्या रविवारी (दि.20) निषेध सभा आणि एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या निषेध सभेमध्ये घरकुल ऑफ फेडरेशन, मदरसा हस्नैन घरकुल, महात्मा फुले जनसेवा मंडळ, संविधान दिन सोहळा समिती, सम्यक क्रांती महासंघ, समस्या निवारण समिती, जागृत नागरी महासंघ, घरकुल अपंग सहाय्य संस्था, घरकुल खान्देश जनसेवा मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, सातारा मित्रपरिवार घरकुल, शिवतीर्थ प्रतिष्ठान, शिवरक्त प्रतिष्ठान, संघर्ष प्रतिष्ठान, शिवशौर्या प्रतिष्ठान, घरकुल प्रतिष्ठान, संकट मोजन प्रतिष्ठान, युवा गर्जना व सर्व महिला बचत गट, क्षत्रिय कुलवंत प्रतिष्ठान, जगदंब प्रतिष्ठान आदींनी या निषेध सभेत भाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.