Pune : रेल्वे राज्यमंत्र्यांशी खासदार गिरीश बापट यांची चर्चा

पुणे- मीरज दुहेरीकरण युद्ध पातळीवर

एमपीसी न्यूज – पुणे- मीरज लोंढा हा ४६५ किलोमीटरचा रेल्वे मार्ग युद्धपातळीवर पूर्णत्वास नेण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी बुधवारी खासदार गिरीश बापट यांना दिले.

नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयात झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी पुणे- मीरज लोंढा या प्रकल्पाच्या दुहेरीकरणाचा आढावा घेतला. खासदार संजय अण्णा पाटील व श्रीनिवास पाटील यावेळी उपस्थित होते. हा एकूण प्रकल्प ४६५ कि. मी. लांबीचा असून त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे ते मीरज  २८० कि. मी.चा समावेश आहे, अशी माहिती गिरीश बापट यांनी पत्रकारांना दिली. पुणे, सातारा, मीरज, सांगली, कोल्हापूर या परिसरातील रेल्वे प्रवाशांची ही मागणी लवकर पूर्ण करावी, अशी विनंती महाराष्ट्राच्या वतीने आम्ही केली. त्यावेळी मंत्री महोदय यांनी या प्रस्तावाचा खर्च, आराखडा व त्यासाठी लागणारे भूसंपादन याची माहिती रेल्वेच्या व्यवस्थापकांकडून घेतली.

_MPC_DIR_MPU_II

भूसंपादनाचे काम रेंगाळल्याने प्रकल्प लांबणीवर पडला आहे. म्हणून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्राच्या वतीने यावेळी करण्यात आली. तसेच निश्चित वेळ आखून हा प्रकल्प पूर्ण करावा, अशी सूचना बापट यांनी केली.
दरम्यान, केंद्रीय नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ‘वननेशन’ ‘वनरेशनकार्ड’ या उपक्रमाबद्दल बापट यांनी चर्चा केली.

महाराष्ट्रातील नागरिकांना देशभरात कुठेही शिधा, रॉकेल व धान्य सहजपणे मिळायला हवे यासाठी तातडीने हालचाल करावी, अशी विनंती बापट यांनी पासवान यांना केली. महाराष्ट्रामध्ये शिधापत्रिकेची व्यवस्था ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे केंद्राच्या नियोजित योजनेला बळ मिळेल, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात बायोमेट्रिक पद्धतीने शिधा वाटप केले जाते. ती योजना देशभर अमलात आणावी, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1