Chakan : गिरीश बापट शकुनी मामा – आढळराव पाटील

चाकणला सेनेचा निर्धार मेळावा ; बापट यांच्यावर सर्वच नेत्यांची सडकून टीका

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात शिवसेनेने युतीचा धर्म पाळला मात्र मित्र पक्ष भाजपने पाठीत खंजीर खुपसला. पुणे जिल्ह्याचे माजी पालक मंत्री गिरीश बापट यांनी शकुनी मामाची भूमिका पार पडल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकण (ता. खेड) येथे केली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसला. खेडमध्ये भाजपने बंडखोरी केल्याने सेनेला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी चिंतन बैठक व कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा चाकणमध्ये रविवारी (दि. ३) आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार आढळराव बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, खेड तालुक्यात झालेल्या पराभवाला सर्वस्वी भाजपचे नेते जबाबदार आहेत. त्यांनीच बंडखोर उमेदवारांना ताकद देण्याचे काम केले. बापट यांनी अनेक कार्यकर्त्यांना बंडखोर उमेदवारांचे काम करण्याचे आदेश दिल्याचे पुरावे यावेळी आढळराव यांनी मांडले. त्यामुळे पुढील काळात शिवसेना भाजप शिवाय स्थानिक स्वराज्य संस्था ते पुढील सर्व निवडणुका जिल्ह्यात लढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी आमदार सुरेश गोरे म्हणाले की, ‘बापट’ म्हणजे सर्वात मोठे ‘कपट’ आहे. खेड आळंदी विधानसभा निवडणुकीत यावेळी जरी अपयश आले असले तरी पुन्हा उभारी घेऊन खेड तालुक्यावर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

दरम्यान, खेड आळंदी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यास सेनेचे जिल्हाप्रमुख माऊली आबा कटके, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, इरफान सय्यद, किरण मांजरे, अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, राजेश जवळेकर, विजया शिंदे, नंदा कड, प्रकाश वाडेकर, संतोष डोळस आदींसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

कार्यकर्त्यांच्या भावना –

आपापसातील मतभेद बाजूला सारून एकदिलाने एकत्र रहावे. तालुक्यातील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू नये. त्यांना बळ द्यावे. प्रलंबित विकासाचे प्रश्न हाती घ्यावेत. विरोधी मंडळी प्रशासनाच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करून हैराण करतील, अशी भिती अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त करताना, आगामी निवडणुकांमध्ये जोमाने उतरावे, अशा भावना बहुतांश कार्यकर्त्यांनी मांडल्या. आपल्या हक्काच्या मतांचे नियोजनबद्ध रित्या विभाजन करण्यात आल्याने आपला पराभव झाल्याची खंत अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.