Pimpri News : गिरीश प्रभुणे, सावनी रवींद्र आणि शरणकुमार लिंबाळे यांना राष्ट्रीय सन्मान हा शहराचा बहुमान

एमपीसी न्यूज : ( श्रीकांत चौगुले  ) कामगारनगरी, औद्योगिकनगरी अशी पिंपरी चिंचवडची ओळख आहे. पिंपरी-चिंचवडचे समृद्ध महानगरात रूपांतर होत आहे. शहरातील अनेक उपक्रमांमुळे शहराला सांस्कृतिक झळाळी प्राप्त होत आहे‌ पण गेल्या वर्षभरात सांस्कृतिक क्षेत्र ठप्प झाले आहे. कोरोनामुळे काहीसे नकारात्मक वातावरण आहे.

2020 हे वर्ष सरले आणि नव्या वर्षाच्या आरंभापासून आत्तापर्यंत तीन महिन्यात, तीन राष्ट्रीय पुरस्कार ,शहरातील तीन व्यक्तींना घोषित झाले. ही शहरवासीयांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

सामाजिक कार्यासाठी, गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार, गायिका श्रावणी रवींद्र यांना उत्कृष्ट पार्श्वगायिका हा राष्ट्रीय पुरस्कार ख्यातनाम साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना मानाचा सरस्वती सन्मान, असे सामाजिक, सांगीतिक, साहित्यिक क्षेत्रातील तीन राष्ट्रीय पुरस्कार शहराची सांस्कृतिक उंची वाढवणारे आहेत.

ही बाब शहराच्या इतिहासात महत्त्वाची आहे. शहरात अल्पावधीत तीन पुरस्कार, तेही पहिल्यांदाच प्राप्त होत आहेत .सामाजिक कार्यासाठीचा शहरातील पहिला पद्मश्री पुरस्कार प्रभूणे यांना मिळाला आहे. भारत सरकारच्या वतीने सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून पद्म पुरस्कार दिले जातात यापूर्वी 2001 मध्ये ख्यातकीर्त उद्योजक राहुल बजाज यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

राहुल बजाज  आकुर्डी येथील बजाज कंपनीच्या परिसरात राहत होते. ते आपल्या शहराचे नागरिक आहेत.

प्रभूणे काकांचे कार्य सर्वपरिचित आहे .पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रारंभीच्या काळापासूनचे त्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. 1972मध्ये चापेकर स्मारक समितीची स्थापना झाली.

त्यामार्फत त्यांनी चापेकर वाडा, चापेकर शाळा. यांच्या उभारणीत पुढाकार घेतला. सुरुवातीला त्यांनी मधुमिलिंद हे मासिक तर असिधारा हे साप्ताहिक काही काळ चालविले. नंतरच्या काळात भटक्या विमुक्तांच्या कार्यासाठी वाहून घेतले. सोलापूर जिल्ह्यात यमगरवाडी येथे फासेपारधी समाजातील मुलांसाठी शाळा सुरू केली. 2006 मध्ये चिंचवड येथे समरसता गुरुकुलम् या संस्थेची स्थापना केली.

भटक्या-विमुक्त समाजातील मुलांना कौशल्यावर आधारित शिक्षण देणारी व भारतीय परंपरा जोपासणारी ही शाळा अल्पावधीतच नावारूपाला आली. प्रभुणे काका हे उत्तम लेखक आहेत. पालावरचं जिणं, लोक आणि संस्कृती, पारधी इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत प्रारंभीच्या काळात ज्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यापैकीच एक प्रभूणे काका आहेत.

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका हा राष्ट्रीय सन्मान गेल्या आठवड्यात गायिका सावनी रवींद्र यांना जाहीर झाला. पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक जगतात, गांगुर्डे परिवाराचे मोठे योगदान आहे. रवींद्र घांगुर्डे व वंदना घांगुर्डे यांनी अभिजात संगीतासाठी तसेच संगीत रंगभूमीसाठी फार मोठे योगदान दिले आहे .दोघांनीही संगीतातील संशोधनासाठी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.

नादब्रह्म संस्थेच्या माध्यमातून केलेले कार्य शहराची सांस्कृतिक उंची वाढवणारे आहे. अशी सांगीतिक पार्श्वभूमी सावनीला लाभली. आईवडिलांकडे संगीताचे प्रारंभिक शिक्षण घेतल्यानंतर ,प्रसिद्ध गायक व संगीतकार यशवंत देव यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.

त्यानंतर अनेक दिग्गज कलाकारांबरोबर भावसंगीताचे मंचीय कार्यक्रम केले .होणार सुन मी या घरची ,या मालिकेचे शीर्षक गीत सावनीने गायले ,त्या गीताने प्रसिद्धी मिळाली. अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले .त्यामध्ये अजब लग्नाची गजब गोष्ट ,मानसन्मान, ती रात्र, पाच नार एक बेजार ,असे काही चित्रपट आहेत. पण सर्वात महत्वाचे म्हणजे बार्डो हा मराठी चित्रपट. त्यातील अहिराणी बोलीतील गीत ,मायेच्या डोहाले पाजर नाही. डोयाच्या पाण्याले घागर नाही.. रान पेटलं….

 हे आर्त स्वरातील गाणं राष्ट्रीय किर्ती बहाल करून गेले. अजून हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. प्रदर्शनापूर्वीच या गाण्याने उंची गाठली ती सावनी रविंद्र गांगुर्डे यांच्या गायकीमुळे ,याचा सर्वांनाच अभिमान आहे.

तिसरा आणि महत्त्वाचा राष्ट्रीय पुरस्कार शरणकुमार लिंबाळे यांना नुकताच जाहीर झाला आहे. निंबाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील ,त्यांचं दुःख त्यांच्या जन्मापासूनच सुरू होतं .तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी शिक्षण घेतले. सुरुवातीला टेलिफोन ऑपरेटर, त्यानंतर सोलापूर आकाशवाणीत निवेदक ,नंतरच्या काळात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्राध्यापक व शेवटी विभागीय संचालक म्हणून ते निवृत्त झाले.

निंबाळे सर गेल्या वीस वर्षांपासून नवी सांगवीत स्थायिक आहेत. त्यांचे साहित्यिक कर्तृत्व उत्तुंग आहे. त्यांची  चाळीसहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत .त्यांनी विविधांगी लेखन केले आहे. कविता ,कथा ,कादंबरी,चरित्र, समीक्षात्मक असे त्यांचे लेखन आहे .अक्करमाशी या आत्मकथनाने त्यांना ओळख दिली. त्यानंतर बारामाशी, राणीमाशी हे आत्मकथनाचे पुढचे भागही प्रसिद्ध झाले.

दलित साहित्याच्या समीक्षेचा अभ्यास हा त्यांचा प्रबंधाचा विषय आहे. दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्रही त्यांनी मांडले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सनातन या साहित्यकृतीला देशातील प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान प्राप्त झाला. ही कादंबरी मुघल व ब्रिटिश कालखंडावर वेगळा प्रकाश टाकते.

या कालखंडातील स्वातंत्र्यलढ्यात दलित व आदिवासींच्या योगदानाचे योग्य चित्रण झालेले नाही ते त्यांनी उत्तम पद्धतीने नव्याने मांडले आहे. या पुरस्काराचे महत्त्व म्हणजे देशातील 22 भाषांमधील दरवर्षी एका भाषेतील एका साहित्यकृतीचा सन्मान केला जातो. त्यासाठी पुरस्काराची रक्कम 15 लाख इतकी आहे. यावरून या पुरस्काराचे महत्त्व लक्षात येते.

एका विचारवंताने म्हटले आहे कोणत्याही शहराची उंची ही त्या शहरातील उंच वाढणाऱ्या इमारतीवर अवलंबून नसते तर त्या शहरातील कर्तुत्ववान व्यक्तींच्या उंचीवर अवलंबून असते. शहरात उंच उंच इमारती तर सगळीकडेच वाढत आहेत, पण ती उंची खुजी वाटावी. अशी सह्याद्रीच्या उंचीची कर्तृत्वसंपन्न माणसं आपल्या शहरात आहेत. याचा नक्कीच अभिमान आहे.

तीन कर्तृत्वसंपन्न व्यक्ती आणि त्यांचे राष्ट्रीय पुरस्कार यामुळे शहराची सांस्कृतीक पत वाढली आहे .या पुरस्काराची प्रेरणा घेऊन पुढील पिढी अधिक क्रियाशील होईल ,नव्या उमेदीने यशाकडे मार्गक्रमण करेल. शहराच्या लौकिकात भर घालणारे हे पुरस्कार कायमस्वरूपी प्रेरणादायी ठरतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.