Pimpri : नोंदणीकृत कामगारांना पाच लाख रुपये अपघात विमा द्या !

महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांची कामगार मंत्र्यांकडे मागणी 

मंडळाचे कार्यालय सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळातील नोंदणीकृत कामगारांना पाच लाखापर्यंत नुकसान भरपाई देण्याची मागणी, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात यावी. तसेच पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे कार्यालय देखील सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणीही त्यांनी  केली आहे.

याबाबत राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कामगार नेते इरफान सय्यद यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळातील 90 टक्के नोंदणीकृत कामगार महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सभासद आहेत. महाराष्ट्र मजदूर संघटना या कामगारांचे प्रतिनिधीत्व करत आहे. नोंदणीकृत कामगार या मंडळाच्या कार्य क्षेत्रामध्ये विविध वाहतूक व्यवसाय, गोदामे, औद्योगिक क्षेत्रामध्ये कष्टाची कामे करुन उपजिवीका चालवित आहेत. या कामगारांचे काम मोठ्या प्रमाणात मालवाहू वाहनावरील आहे. काम करत असना अपघातासारख्या स्थितीला त्यांना सामोरे जावे लागते.

नियमामुसार माथाडी मंडळ वर्गवारीच्या तरतुदीनुसार आणि विमा योजनेच्या सहकार्यातून अपघात नुकसान भरपाई निश्चित देते. परंतु, ही भरपाई अतिशय तुटपुंजी आहे. अशा अपघातात कामगारांचे मृत्यू देखील होतो.  मृत्यू झालेल्या कामगाराच्या वारसास दिली जात असलेली भरपाई किंवा त्या संबंधातील विमा योजनेतील तरतुदी अपु-या आहेत. या तरतूदी 25 वर्षापूर्वी निश्चित केल्या आहेत. बदलत्या परस्थितीमध्ये त्यात सुधारण करण्याची नितांत आवश्यकता आहे. पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना अपघातातून मृत्यू आल्यास कामगाराच्या वारसास किमान पाच लाख रुपये भरपाई मिळावी. त्यासाठी तरतूद करण्याची मागणी, सय्यद यांनी केली आहे.

याशिवाय पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित मंडळाचे कार्यालय चिंचवड येथे झोपडपट्टी परिसरात आहे. या कार्यालयात हजारो नोंदणीकृत कामगारांच्या कागदपत्रांसह करोडो रुपयाची मजुरी व लेव्ही आवज-जावक होते. अनेक वेळा हे कार्यालय फोडण्यात आले आहे. तसेच कार्यालय जाळण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. त्यामुळे कार्यालयाची असुरक्षितता निर्माण झाली असून या ठिकाणी अतिशय घाण असते. दुर्गंधी पसरलेली असते. याचा कामगारांना मोठा त्रास होत आहे. त्यासाठी त्वरित हे कार्यालय सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, अशी मागणी देखील सय्यद यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.