Raju sapte Suicide : राजू सापते यांना न्याय द्या, न्यायासाठी मराठी चित्रपटसृष्टी सरसावली

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी त्यांच्या ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत असून,आत्महत्या करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही, व मला न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी आपल्या व्हीडिओतून केली आहे. दरम्यान, राजू सापते यांना न्याय द्यावा यासाठी मराठी कलाकार सरसावले असून, जस्टिस फॉर राजू सापते हा हॅशटॅग वापरून मराठी कलाकारांनी ट्वीट केले आहे. 

दिग्दर्शक रवी जाधव यांनी ट्वीट करत राजू सापते यांना न्याय मिळाला पाहिजे असे मत मांडले आहे. ‘काल राजू साप्ते या अत्यंत अभ्यासू आणि गुणी कला दिग्दर्शकाने काही समाजकंटकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली हे अत्यंत दूर्दैवी आहे. राजू हा माझा जे. जे. मधील वर्ग मित्र. त्याला लवकरात लवकर न्याय मिळो आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभो हिच प्रार्थना ‘ असं ट्वीट रवी जाधव यांनी केले आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव याने जस्टिस फॉर राजू सापते हा हॅशटॅग वापरून ट्वीट करत न्यायाची मागणी केली आहे.

चित्रपट निर्माते दिपक राणे यांनी विविध ट्वीट करत राजू सापते यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राजू सापते यांच्या आत्महत्येबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘होय #मी_धमकी देतोय… याला #धमकी समजा… याच्या पुढे कोणत्याही निर्मात्या, दिग्दर्शक, कलाकाराला जर सेट वर जाऊन त्रास दिलात तर हातपाय तोडून ठेवल्या शिवाय राहणार नाही…’ असे ट्वीट अमेय खोपकर यांनी केले आहे.

दरम्यान, राजू सापते यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांच्या बिझनेस पार्टनरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांनी बिझनेस पार्टनरला अटक देखील केली आहे. चंदन रामकृष्ण ठाकरे (वय 36, रा. एकतानगर, कांदिवली वेस्ट, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह नरेश विश्वकर्मा (मिस्त्री), गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई), राकेश मौर्य, अशोक दुबे (सर्व रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.