Chinchwad : लक्ष्मण जगताप यांना राज्यातील प्रथम क्रमांकाचे मताधिक्य द्या – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. शहरातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार जगताप यांनी यशस्वी पाठपुरावा केला असून, त्यांनी हे प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे चिंचवडकरांनी जगताप यांना राज्यातील क्रमांक एकचे मताधिक्य देऊन प्रचंड मोठा विजय त्यांच्या झोळीत टाकावा, असे आवाहन शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

प्रचारानिमित्त थेरगावमध्ये बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले, काही प्रलंबित प्रश्न कायदेशीर अडचणींमुळे सुटण्यास उशीर होत आहे. पण हे प्रश्न सुद्धा फक्त अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. त्यासाठी जगताप यांनी पुन्हा आमदार होणे गरजेचे आहे. चिंचवड मतदारसंघातील जनता महायुतीचे उमेदवार आमदार जगताप यांच्या विकासात्मक नेतृत्वाचा अनुभव घेतलेली जनता आहे.

विकासाच्या बाबतीत चिंचवड विधानसभा मतदारसंघ कायम अग्रेसर राहिला आहे. मतदारसंघात झालेले अनेक मोठे प्रकल्प, सुरू असलेली कामे यांमुळे या मतदारसंघाचे सर्वांना आकर्षण वाटत आहे. आमदार जगताप यांनी दिलेल्या योगदानामुळे हे शक्य झाले आहे. मतदारसंघातील नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अनेक महत्त्वाचे बीआरटीएस रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारे अभियंते, कर्मचारी व कामगारांची चिंचवड मतदारसंघात राहण्यासाठी पसंती असते. या सर्वांना आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता यावे म्हणून मतदारसंघात चांगले रस्ते तयार करण्यात आले आहेत.

स्मार्ट सिटी, नदी सुधार, झोपडपट्ट्यांचा शास्वत विकास यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी लक्ष्मण जगताप हेच आमदार असणे तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी मतदारसंघातील मतदारांनी लक्ष्मण जगताप यांना राज्यातील प्रथम क्रमांकाचे मताधिक्य देऊन विधानसभेवर पाठवावे, असे आवाहन बारणे यांनी केले.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.