Pimpri News : शहरपातळीवर शिवसेनेचे नेतृत्व करण्याची संधी उत्तर भारतीय निष्ठावंतांना द्या – विजय गुप्ता

एमपीसी न्यूज – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकुर्डीत शिवसनेच्या पिंपरी विधानसभेची बुधवारी (दि. 18) रोजी पदाधिकारी आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी शहरातील पक्ष बांधणीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शहरपातळीवर शिवसेनेचे नेतृत्व करण्याची संधी उत्तर भारतीय निष्ठावंतांना देण्याची मागणी पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी वरिष्ठांकडे केली.

खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर ,पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, युवा सेना विस्तारक राजेश पळसकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी-चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख वैभव थोरात, शहरप्रमुख सचिन भोसले शहरातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत विजय गुप्ता यांनी पिंपरी-चिंचवड शहरात उत्तर भारतीय नागरिकांचे प्रश्न उपस्थित केले. उत्तर भारतीय नागरिक अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्य करीत आहेत. केवळ निवडणुकांपुरतेच त्यांना लक्षात ठेवले जाते. उत्तर भारतीयांच्या हितासाठी शहरपातळीवर शिवसेनेचे नेतृत्व करण्याची संधी पक्षातील निष्ठावंतांना देण्याची गरज निर्माण झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन गुप्ता यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.