Pune : राडारोडा प्रकरणात ज्ञानेश्वर मोळक-सुधीर चव्हाण यांना कामावरून काढून टाका – वसंत मोरे

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील राडारोडा प्रकरणात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक आणि कार्यकारी अभियंता सुधीर चव्हाण यांना कामावरून काढून टाका, अशी मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर उपस्थित होते.

राडारोडा विल्हेवाटसाठी ७ कोटी ३६ लाखाची निविदा काढून ठेकेदार पोसण्याचे काम या अधिकाऱ्यांकडून होत आहे. आयुक्तांचे आदेश धुडकावून 2 महिन्यांत पुन्हा पंचवीस लाखांची निविदा काढण्यात आली. देवाची – उरूळी आणि फुरसुंगी डेपो येथे लॅण्डफिलमध्ये दैनंदिन कचरा व्यवस्थापनासाठी माती पुरविण्याच्या कामाची २ ऑगस्ट २०१९ रोजी २४ लाख ९९ हजार ८९० रूपयांची निविदा काढण्यात आली. हे काम पाटील कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिले असता, बालाजी अर्थ मुवर्स या कंपनीमार्फत माती टाकण्याचे काम केले जात आहे़.

ही मातीही कचरा डेपो परिसरातील अवघ्या अडीच किलोमीटर अंतरातील शेतातील आहे. दिनांक २ फेब्रवारी २०२० पासून आजपर्यंत २०० गाड्या माती कचरा डेपोमध्ये टाकली गेल्याची नोंद करण्यात आली आहे. बालाजी अर्थ मुवर्सकडून हे काम केले जात आहे, त्याच कंपनीकडे महापालिकेच्या व्हेयिकल डेपोला गाड्या पुरविण्याचे काम असून, यामध्ये ज्या गाड्या व्हेलिकल डेपोमध्ये आहे. त्याच क्रमांकाच्या गाड्या ही माती टाकण्याचे काम करीत आहे.

तर, राडारोडा आणि माती उचलण्याचे कोट्यावधींचे काम ज्या ठेकेदारांना देण्यात आले आहे, हे ठेकदार ज्ञानेश्वर मोळक यांच्या मुलाच्या शिवस्मृती प्रतिष्ठानचे प्रायोजक आहेत. यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोपही मोरे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.