_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri : अर्थसंकल्पामध्ये पिंपरीतील उद्योजकांना विशेष कर सवलत द्या, युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – रोजगार वाढीला प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजकांना विशेष कर सवलत देण्यासाठी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस मयूर जयस्वाल यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे  निवेदनद्वारे करण्यात आली.

देशातील वाढती बेरोजगारी हा सर्वात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेली 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग आणि सीएमआयई संघटना सांगत आहेत. देशातील बेरोजगारीचे आव्हान प्रचंड असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर  राज्य आहे. वाहन, कापड, बांधकाम तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. पिंपरी-चिंचवड हे ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखले जाते.

_MPC_DIR_MPU_II

जगातील वाहन क्षेत्रातील सर्व मोठे कारखाने पिंपरी, चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडी औद्योगिक क्षेत्रात आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये ज्या प्रमाणात औद्योगिक प्रगती झाली त्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील झाली. परंतु 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर नोटबंदी , जीएसटी सारखे अविचारी निर्णय व ढासळती अर्थव्यवस्था या सर्व कारणांमुळे देशात व राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, सारख्या योजना पूर्णपणे फसल्या व त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. परंतु या परिस्थितीत देखील अनेक उद्योगधंदे आपले अस्तित्व टिकवून आहेत. अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. या उद्योजकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी तसेच रोजगार वाढीसाठी अर्थसंकल्पात विशेष कर सवलत देण्याची तरतूद करावी. जेणे करून औद्योगिक प्रगती होईल रोजगार निर्माण होईल, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. युवक काँग्रेसची ही मागणी मान्य करून थोरात यांनी त्वरीत उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश विभागाला दिले आहेत.

या निवेदनावर सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे चंद्रशेखर जाधव, संदेश बोर्डे, कुंदन कसबे, गौरव चौधरी,  विशाल कसबे, तुषार पाटील, वसीम शेख, अनिकेत आरकडे, रोहित शेळके यांची स्वाक्षरी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.