Pune : पुण्यात प्रथमच 1 ते 4 नोव्हेंबर ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’

एमपीसी न्यूज- कोकणातील निसर्ग समृद्धी, पर्यटन उद्योग, शेती, हापूस, फलोद्यान , मत्स्यउद्योग, पायाभूत सुविधा, विकासाच्या आणि उद्योगांच्या संधी ,लोककला संस्कृती, खाद्य पदार्थ,बांधकाम उद्योग ,स्वयंरोजगार यांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणारा ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल 2019 ‘ प्रथमच पुण्यात होणार आहे, अशी माहिती ‘ ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ चे संस्थापक संजय यादवराव, सहसंयोजक एम. क्यू. सय्यद (व्यवस्थापकीय संचालक ,एक्झिकॉन ग्रुप ) यांनी पत्रकाद्वारे दिली.

हा फेस्टिव्हल मेस्से ग्लोबल एक्झिबिशन सेंटर, लक्ष्मी लॉन्स, मगरपट्टा सिटी, हडपसर येथे दिनांक 1 ते 4 नोव्हेंबर या दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत होणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता केंद्रीय वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, थायलंडचे माजी उपपंतप्रधान डॉ. सोनथी बुन्यारातग्लीन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र मदत व पुनर्वसन प्राधिकरणाचे अध्यक्ष माधव भांडारी यांच्या उपस्थितीत लक्ष्मी लॉन, मगरपट्टा सिटी येथे होणार आहे .

जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा , उद्योजक प्रकाश छाब्रिया ,सतीश मगर, अनिरुद्ध देशपांडे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, वंदना चव्हाण, संजय काकडे, आमदार प्रवीण दरेकर, भाई जगताप, योगेश टिळेकर, पिंपरी -चिंचवडचे महापौर राहुल जाधव फेस्टिव्हलला भेट देणार आहेत .

‘ग्लोबल कोकण’ ही कोकण भूमी प्रतिष्ठानची कोकणला जागतिक व्यासपीठ मिळवून देणारी अराजकीय चळवळ असून आतापर्यंतचे ६ ग्लोबल कोकण फेस्टिव्हल मुंबईत झाल्यानंतर यंदाचा सलग सातवा हा आंतरराष्ट्रीय महोत्सव पुण्यात होत आहे. एरवीही वर्षभर व्याख्याने ,कार्यशाळा ,प्रशिक्षण वर्ग, अभ्यासदौरे यांचे आयोजन ‘ग्लोबल कोकण’ द्वारे केले जाते .

कोकणातील लोककला, कोकण फॅशन शो, कोकणातील पर्यटन सुविधा, होम स्टे, रिसॉर्ट प्रदर्शन, ‘फिश फेस्टिव्हल’, कोकणातील बांधकाम व्यवसाय, गुंतवणूक संधी, कोकणी उत्पादने, फळ व अन्न प्रक्रिया उद्योग असे कोकणचे विश्वरूप दर्शन प्रथमच पुणेकरांना या कोकण फेस्टिव्हलद्वारे होणार आहे असे एम क्यू सय्यद यांनी सांगितले. कोकणविषयक माहिती, मनोरंजन, उपक्रम जाणून घेण्याची पुणेकरांना ही पर्वणी आहे .

150 हून अधिक स्टॉल्स, 500 हून अधिक कोकणी उद्योजकांचा सहभाग, 50 कोटीहून अधिक अपेक्षित उलाढाल, 2 लाखहून अधिक कोकणप्रेमींची उपस्थिती अशी या पुण्यातील पहिल्या ग्लोबल कोकण फेस्टिव्हलची व्याप्ती आहे, असे किशोर धारिया यांनी सांगितले.

कोकणात स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी ‘मेक इन कोकण ‘ हे भव्य दालन उभारण्यात येणार आहे. कोकण ,येथील निसर्ग यावर प्रेम करणाऱ्यांसाठी हा फेस्टिव्हल हा पहिला आनंद सोहळा ठरणार आहे. पंडीत वसंत गाडगीळ ग्लोबल कोकण फेस्टिव्हल, पुणे साठी दररोज येऊन संस्कृत पठण, श्लोक म्हणणार आहेत, अशी माहिती संजय यादवराव यांनी दिली .

खवय्या पुणेकरांसाठी अनोखी मेजवानी

कोकण महोत्सवात कोकण जेवणाचा अविभाज्य भाग असणारा फिश महोत्सवाचा समावेश असणार आहे. याशिवाय लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दररोज ग्लोबल कोकण मार्गदर्शन परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. कोकणातील उद्योगाच्या व व्यवसायाच्या संधी व यातून ग्रामविकास हा उद्देश असून यशस्वी उद्योजक व मान्यवर तज्ञाचे मार्गदर्शन परिसंवादात होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.