Pimpri : इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे ज्ञानप्रबोधिनीला बायोगॅस प्लांट भेट

एमपीसी न्यूज – नैसर्गिक वायूच्या वापरासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. या संकल्पनेतून इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेला बायोगॅस प्लांट भेट देण्यात आला.

गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात  बायोगॅस प्लांट भेट देण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी दलाल, रेखा मित्रगोत्री, रंजना कदम, नेहा देशमुख, आरती मुळे, रेणू मित्रा, मुक्ती पानसे, वैशाली देवतळे, अर्जुन दलाल आदी उपस्थित होते. ज्ञानप्रबोधिनी निगडी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने सहभाग घेतला.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “नैसर्गिक स्रोतांपासून निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर उपयोग आपण घ्यायला हवा. बायोगॅस प्रकल्पातून तयार होणारा नैसर्गिक वायू इंधन बचतीचा उत्तम पर्याय आहे. इनरव्हील क्लब ऑफ निगडीचा हा प्रयत्न खूप चांगला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धन, नैसर्गिक स्रोतांचा वापर आणि पर्यावरण पूरक शिक्षण मिळणार आहे.”

अध्यक्षा प्रतिभा जोशी दलाल म्हणाल्या, “नैसर्गिक वायू अन्य वायूच्या तुलनेत फायदेशीर ठरतो. ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये शाळेचे कॅन्टीन आहे. या बायोगॅस प्रकल्पाचा उपयोग कॅन्टीनसाठी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण व्यवस्थापन शाळेतील विद्यार्थी करणार असून त्यांना शाळेचे शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे मुलांना पुस्तकी शिक्षणासोबत प्रात्यक्षिके देखील करावयास मिळणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.