BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गोल्फपटू रोहन ढोले-पाटील भारतात अव्वल ; वर्षाअखेरीस भारतीय अमॅच्युर गोल्फपटूंची क्रमवारी जाहीर

एमपीसी न्यूज – भारतीय गोल्फ युनियनकडून वर्षाअखेरीस जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत अमॅच्युर पुरुष गटात पुण्याच्या रोहन ढोले-पाटील याने अव्वल क्रमांक पटकावला आहे.भारतीय गोल्फ युनियनकडून दरवर्षी ही क्रमवारी जाहीर केली जाते. यात वर्षभरातील सर्वोत्तम आठ स्पर्धांतील कामगिरी गृहीत धरली जाते. त्यातील मिळालेल्या गुणांनुसार क्रमवारीतील स्थान निश्चित केले जात आहे.

या वर्षी २४ वर्षीय रोहनने २८६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्लीचा हर्षजित सेठी २६८ गुणांसह दुस-या, तर गुजरातचा जय पंड्या २२९ गुणांसह तिस-या स्थानावर आहे. या वर्षी रोहन इस्टर्न इंडिया गोल्फ स्पर्धा (५० गुण), कर्नाटक अमॅच्युर गोल्फ स्पर्धा (४०), सदर्न इंडिया (१७), दिल्ली (७), नॉदर्न इंडिया (५५), वेस्टर्न इंडिया (५५), गुजरात (१९), आॅल इंडिया (४३) या आठ स्पर्धांमध्ये सहभागी झाला होता. यातील चार स्पर्धांमध्ये तो दुस-या स्थानावर राहिला होता.

रोहन गेल्या दहा वर्षांपासून गोल्फ खेळतो आहे. तो पूना क्लब गोल्फ कोर्सवर सराव करतो. आदित्य कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो. फिटनेससाठी त्याला विनय कदम यांचे मार्गदर्शन लाभते, तर प्रशिक्षक स्वरूप सवानूर यांचाही मोलाचा सल्ला त्याला मिळत असतो. कुटुंबीय आणि मित्रांच्या मदतीमुळे मी एवढा मोठा टप्पा गाठू शकलो, अशी प्रतिक्रिया रोहनने व्यक्त केली. पुढील मोसमातही कामगिरीत सातत्य राखण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3