Chakan : बकरी ईदमुळे बोकड बाजारात मोठी उलाढाल

चाकण मार्केट; ७५ हजारापर्यंत भाव

(अविनाश दुधवडे)

एमपीसी न्यूज – मुस्लीम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण बाजारात शेळ्या, मेंढ्या, बोकड; तसेच गुरांच्या बाजारातून चार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली. राज्याच्या विविध भागांसह लगतच्या राज्यातील व्यापाऱ्यांनीही बोकड खरेदीसाठी चाकण मार्केटमध्ये शनिवारी (दि.१८) गर्दी केली होती.

मागील दोन-तीन आठवड्यांपासून शेळ्या, मेंढ्या, बोकड बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल सुरु झाली आहे. त्यामुळे मार्केट फीच्या माध्यमातून बाजार समितीला उच्चांकी उत्पन्न मिळाल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली. चाकण बाजार समितीच्या आवारात बैल, गायी, म्हशी आदी जनावरांचा बाजार भरतो; तर रोहकल रस्त्यावर शेळ्या, मेंढ्या, बोकडांचा बाजार भरतो. बुधवारी (दि.२२) साजऱ्या होणाऱ्या ‘बकरी ईद’ सणामुळे चाकण बाजारात संपूर्ण पुणे जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील शेळ्या, मेंढ्या, बोकडांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.

चाकणमधील गुरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध असल्याने राज्यभरातून व्यापारी शेळ्या, मेंढ्या, बोकडांची खरेदी-विक्री करण्यासाठी येत आहेत. या बाजारात यंदा आलेले मोठे-मोठे बोकड विशेष आकर्षण ठरले बाजार समितीचे सचिव चांभारे यांनी सांगितले की, बकरी ईद निमित्त बाजारात बोकड व शेळ्या-मेंढ्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. बोकड बाजारात सुमारे ३ कोटींची व बैल बाजारात १ कोटीची अशी एकूण ४ कोटींची उलाढाल झाली. बाजार समितीला शेळ्या-मेंढया बाजारापासून ३ लाख व बैल बाजारापासून १ लाख असे एकूण ४ लाखांचे उत्पन्न मिळाले.

चाकणचा बोकड बाजार राज्यात प्रसिद्ध असल्याने बकरी ईद सणासाठी बोकड खरेदी-विक्री करण्यासाठी धुळे, नंदुरबार, नाशिक, इगतपुरी, सिन्नर, गुजरात, राजस्थान आदी भगातून विक्रेते येतात. त्याचप्रमाणे मुंबई, पनवेल, खोपोली, पिंपरी, चिंचवड, भोसरी, पुणे, कोल्हापूर बेळगांव, निपाणी, हुबळी आदी ठिकाणांवरुन व्यापारी खरेदी करीता येतात. कपाळावरती चंद्राकृती आकार असणाऱ्या बोकडाला शुभ मानले जाते. त्यामुळे अशा बोकडांना जास्त किंमत मिळते. शनिवारी चाकण बाजारात सुमारे ३ हजार ५०० बोकडांची आवक झाली. त्यामध्ये २ हजार ५०० बोकडांची विक्री झाली. ४ हजार ५०० शेळ्या मेंढयांची आवक होऊन ३ हजार ६०० विक्री झाली. एका बोकडाला १० हजार ते ७५ हजार रुपये असा भाव तसेच शेळया मेंढयांना ५ हजार ते १० हजार रुपये भाव मिळाल्याचे सचिव सतीश चांभारे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.