Pune News : खून का बदला खून ! गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपीचा जामीनावर बाहेर येताच वडिलांसह निर्घृण खून

एमपीसी न्यूज : मागील वर्षी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोल्ड मॅन सचिन शिंदे याचा गोळी झाडून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील आरोपी इतके दिवस तुरुंगात होते. त्यातील एक आरोपी तुरुंगातून सुटून बाहेर आल्यानंतर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉलची स्टिक आणि दगडाने मारहाण करून निर्घृण खून केलाय. लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. यावेळी मुलाला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या वडिलांवरील हल्लेखोरांनी वार केले. यामध्ये त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला.

प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 22) आणि कुमार शिंदे (वय 55) अशी खून झालेल्या बाप लेकाची नावे आहेत. लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मराठी शाळे पासून शिंदे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मागील वर्षी गोळ्या झाडून सचिन शिंदेचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सनी शिंदे सह तिघांना अटक केली होती. तीन महिन्यांपूर्वी जामीन मिळाल्याने सनी शिंदे हा तुरुंगातून बाहेर आला होता. बुधवारी सायंकाळी तो वडिलांसह लोणीकंद परिसरातून चारचाकी गाडीने जात असताना पाच ते सहा जणांनी त्यांना अडवले. त्यानंतर दगड, कोयता आणि बेसबॉलच्या स्टिकने मारहाण केली.

मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून वडील कुमार शिंदे हे त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडले. आरोपींनी त्यांच्यावर देखील वार केले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर जागेवरच दोघांचा मृत्यू झालाय. माहिती मिळताच लोणीकंद पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यातील काही आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.