chakan : गेला बिबट्या कुणीकडे ? 

बिबट्याचा वनविभागाला चकवा; जाळीतून शिताफीने निसटला;कोयाळी येथील घटना

एमपीसी न्यूज – कोयाळी (ता.खेड) येथे भर लोकवस्तीत झाडावर चढून बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अपयश आले आहे. लोकवस्तीत शिरलेल्या बिबटयाला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र, वनाधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन बिबट्या जाळीतून निसटला असल्याची घटना मंगळवारी (दि.५) सकाळी सातच्या सुमारास घडली. लोकवस्तीत वावर असलेला बिबट्या निसटल्याच्या धसक्याने कोयाळीसह खेड तालुक्याच्या पूर्व भागात राहणा-या नागरिकांची पुरती झोप उडाली आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावलेली जाळी फाटलेली होती. त्यामुळे झाडावरून खाली आलेला बिबट्या जाळीत अडकला. मात्र, बिबट्या त्या जाळीला असलेल्या भगदाडातून वनविभागाला गुंगारा देऊन शिताफीने निसटला.
अधिक वृत्त असे की, कोयाळी येथे मंगळवारी ( दि. ५) पहाटे लोकवस्तीत शिरलेला बिबट्या एका झाडावर चढून बसला. स्थानिक नागरिकांनी पहाटेपासून बिबट्यावर लक्ष ठेवून वन विभागाला माहिती दिली. घटनास्थळी मोठ्या फौजफाट्यासह आलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि रेस्क्यू पथकाने बिबट्या चढून बसलेल्या झाडाच्या खाली जाळी लावली. सकाळी सातच्या सुमारास झाडावरून खाली झेपावलेला बिबट्या जाळीत अडकला.

मात्र, जाळीला असलेल्या मोठ्या छिद्रातून क्षणाचाही विलंब न लावता निसटला. वनविभागाने पळून जाणाऱ्या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. वन विभागाच्या या भोंगळ कारभाराने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. खेड तालुक्यातील पूर्व भागात शेळी, पारडू अशा अनेक पाळीव प्राण्यांची शिकार बिबट्याने केल्याच्या तक्रारी मागील काही महिन्यांपासून स्थानिकांकडून वन विभागाकडे करण्यात येत होत्या.
कोयाळी येथे लोकवस्तीत बिबट्या दिसून आल्याने बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतीच्या कामांवर मोठा परिणाम होत आहे. दरम्यान, उसाची शेती, घनदाट वृक्षराजी, ओढे, शिकारीसाठी पाळीव प्राणी अशी बिबट्याचे वास्तव्य असलेल्या खेड तालुक्याच्या पूर्व भागाची भौगोलिक स्थिती असल्याने बिबट्यांची संख्या या भागात झपाट्याने वाढत असून लोकवस्तीच्या भागात वावरही वाढत आहे.
चाकण वनविभागाचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एम. खताव यांनी सांगितले की, परिसरातील नागरिकांनी घाबरू नये, अफवा पसरवू नयेत मात्र दक्षताही घ्यावी. या बाबत काहीही मदत लागल्यास वनविभागाशी संपर्क साधावा.

नागरिकांचा जीव टांगणीला :
मागील काही दिवसांपासून खेडच्या पूर्व भागात बिबट्याचा वावर वाढल्याच्या तक्रारी होत्या. बिबट्या आला रे… अशी अफवा जरी पसरली… तरीही बिबट्याच्या धसक्याने शेतावरच्या वाड्या- वस्त्यांवर राहणा-या नागरिकांची पुरती झोप उडते. मात्र, वन वनविभागाच्या नाकाच्या खालून बिबट्या पसार झाला आहे. गावातील लोकवस्तीत शेतातच बिबट्या लपून बसलेला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बिबट्या पकडण्यास वनखात्याला अपयश आल्याने या भागातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.