Good Eating habits of children : मुलांच्या आहारातील फास्टफूडचा अतिरेक कसा टाळावा

How to avoid excess of fast food in children's diet

एमपीसी न्यूज – आपले अन्न हे आपले शरीर घडवत असते. त्यामुळे आपण जे आणि जसे खाऊ त्याचा आपल्या शरीरावर योग्य तो परिणाम दिसतो. निरोगी आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी पोषक आणि संतुलित आहार गरजेचा आहे हे आपण सारे जाणतोच. मात्र तरीही बऱ्याचदा अपथ्यकारक आणि चुकीचे अन्नपदार्थ आपणच खात असतो. याचा परिणाम नकळत शरीरावर होऊ लागतो. आपण जसे वागतो तशीच सवय मुलांना लागत असते.

आपल्या या सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपली जीवनशैली हरवून बसलो आहोत. या फास्ट जीवनशैलीप्रमाणेच आपण आता फास्टफूडच्या पण आहारी गेलो आहोत. आजकाल लहान मुलांना जंकफूड, चायनीज, प्रकिया केलेले पदार्थ खाण्याची सवयच लागली आहे. त्यांना घरचे ताजे अन्न आवडेनासे झाले आहे. मात्र त्यामुळे लहान वयातच मुलांचे वजन प्रमाणापेक्षा वाढलेलं दिसून येतं. शिवाय या पदार्थांमधून त्यांचे योग्य पोषणही होत नाही. आणि त्याचे वाईट परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहेत.

एका जागतिक संशोधनानुसार भारतात कुपोषणग्रस्त मुलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गरीब कुटुंबातील मुलं त्यांना पुरेसं खायला मिळत नाही म्हणून कुपोषित असतात. तर चांगल्या सुखसुविधा प्राप्त झालेली मुलं चुकीचे पदार्थ खाण्याने कुपोषित झालेली असतात. लहानपणीच मुलांना जर चांगले पदार्थ खाण्याची सवय लावली तर भविष्यात याचा चांगला परिणाम नक्कीच दिसून येऊ शकतो. यासाठी आपली पारंपरिक आहार पद्धती आदर्श अशीच आहे.

मुलांसाठी पौष्टिक अन्न कोणते ?
मुलांना अन्नपदार्थ आणि त्यातील पोषक घटक जर लहानपणापासूनच माहीत असतील तर ते चुकीचे पदार्थ कमी प्रमाणात खाऊ शकतात. यासाठी घरात एखादा पदार्थ तयार केल्यावर तो मुलांना किती पोषक आहे आणि त्यामुळे शरीरावर कसा चांगला परिणाम होतो याची माहिती आई वडिलांनी देणे आवश्यक आहे. चांगले पदार्थ खाल्यामुळे त्याला कसं वाटलं, त्याचा परिणाम शरीरावर काय झाला, त्यात किती प्रमाणात कोणती पोषणमूल्यं होती याबाबत समजावून सांगा.

आकर्षक​ खाद्य पदार्थ ​
चव आणि सजावट यामुळे मुलं कोणत्याही पदार्थाकडे आकर्षित होत असतात. यासाठी नवनवीन रेसिपी मुलांसाठी घरीच तयार करा. मुलांचा एखादा नावडता पदार्थ जर तुम्ही आकर्षक पद्धतीने त्यांच्यासमोर सर्व्ह केला तर तो त्यांना नक्कीच आवडू शकतो. यासाठी साध्या पदार्थांना त्यांच्या आवडीप्रमाणे सजवून त्यांना खाण्यासाठी द्या.

घरामध्ये पौष्टिक पदार्थ ठेवा

घरात मुलांसाठी जो कोरडा खाऊ तुम्ही ठेवला असेल तो शक्य तितका पौष्टिक असेल याची काळजी घ्या. बऱ्याचदा फ्रीजमध्ये जंकफूड, चॉकलेट, आईस्क्रीम, कोल्डड्रिंक, पॅक्ड फूड भरुन ठेवलेले असतात. ज्यामुळे  मुलांना ते पदार्थ सतत खाण्याची सवय लागते. असे पदार्थ कधीतरी खाण्यास काहीच हरकत नाही. मात्र जर घरात अपथ्यकारक पदार्थ समोर असतील तर ते वारंवार खाल्ले जातात. यासाठी सामान विकत घेताना विनाकारण अशा पदार्थांची साठवण होणार नाही याची काळजी घ्या.

स्वयंपाक करताना त्यांची मदत घ्या 
मुलांना चांगले पदार्थ खायला शिकवण्यासाठी ही युक्ती नक्कीच तुमच्या उपयोगी पडू शकते.  स्वयंपाक करताना अथवा स्वयंपाकाचा मेन्यू ठरवताना मुलांची मदत घ्या. त्यांना किचनमधील छोटी छोटी कामे करण्यासाठी सांगा. ज्यामधून त्यांना तुम्ही पौष्टिक खाद्यपदार्थांचे महत्व समजावून सांगू शकता. एखादा पदार्थ करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे जेव्हा त्यांना स्वतः समजेल तेव्हा तो पदार्थ ते नक्कीच मनापासून खातील.

मुलांना अनुभवातून शिकू द्या 
मुलं नेहमी स्वानुभावातून आणि पालकांच्या आचरणातून शिकत असतात. त्यामुळे मुलांसमोर असे पदार्थ तुम्ही स्वतः खाणे टाळा. ज्यामुळे मुलांना या गोष्टीचे महत्त्व पटू लागेल. शिवाय एखादा चुकीचा पदार्थ खाण्याने काय त्रास होतो हे त्यांना स्वतः अनुभव घेऊन शिकू द्या. पोट बिघडल्यावर, अपचन झाल्यावर त्यांना त्या मागचे कारण मात्र जरूर पटवून द्या.

अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी करुन तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं आणि पौष्टिक खाण्याची सवय नक्कीच लावू शकता. कधीतरी चमचमीत, फास्ट फूडदेखील मुलांना खायला द्या. पण त्याची त्यांना सवय लागू देऊ नका. मुलांना सुरुवातीला ते आवडणार नाही, पण त्यांना अनुभवातून शिकू द्या. म्हणजे मग जे दर्जेदार आहे त्याची त्यांना किंमत कळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.