-MPC-TOP-MOST-BANNER-I

Bhosari News : आनंदाची बातमी ! अखेर वेदीकाला दिले ‘ते’ 16 कोटीचे इंजेक्शन, पालकांना अत्यानंद 

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – भोसरीतील वेदिका सौरभ शिंदे या अकरा महिन्यांच्या चिमुरडीला ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप 1’ या दुर्मिळ आजाराने ग्रासले होते. वेदीकाला ‘झोलगेन्स्मा’ हे 16 कोटीचे इंजेक्शन देणं आवश्यक होते. मंगळवारी (दि.15) सकाळी अकरा वाजता पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये वेदीकाला हे इंजेक्शन देण्यात आले. वन टाईम जिनथेरेपी असल्याने इंजेक्शनचा एकच डोस दिला जाणार आहे. 

वेदीकाच्या उपचारासाठी तिच्या पालकांनी क्राऊड फंडीगच्या माध्यमातून पैसे उभारले. मंगळवारी 16 कोटींचे इंजेक्शन वेदिकाला दिल्यानंतर तिच्या पालकांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

वेदिका अवघ्या आठ महिन्यांची असताना तिला SMA TYPE 1 हा दुर्मिळ आजार झाला असल्याचे निदर्शनास आले. या आजारावर ‘झोलगेन्स्मा’ हे 16 कोटीचे इंजेक्शन देणे गरजेचे होते. एका सामान्य कुटुंबातील वेदिकाचे आई वडील सौरभ आणि स्नेहा शिंदे यांनी जीवाचे रान करून क्राऊड फंडीगच्या माध्यमातून तब्बल 16 कोटी रुपये जमा केले.

‘ज्या दात्यांनी आपल्या आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत केली. सर्व जनतेने आशीर्वाद दिले या सगळ्यांच्या कष्टाचे आज फळ मिळाले आणि वेदिकला इंजेक्शन भेटले’ अशा भावना वेदिकाच्या पालकांनी व्यक्त केल्या.

या इंजेक्शनवरील आयात शुल्क माफ करण्या करिता वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य भवन विभागाशी व केंद्रीय वित्त मंत्रालया बरोबर पत्रव्यववहार केला होता. याची दखल घेवुन केंद्र सरकारने आयातशुल्क व कर माफ केले आहे. यासाठी सिने-अभिनेते निलेश दिवेकर अणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे सचिव संकेत भोंडवे यांचे योगदान मोलाचे होते अशी माहिती वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी दिली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विशेष प्रयत्न करून शक्य तितकी मदत केली , संसदेत अशा आजारांसाठी विशेष तरतूद करावी अशी मागणी देखील केली. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी सुरवातीपासून इंजेक्शन मिळेपर्यंत मदत केल्याचे शिंदे कुटुंबीयांनी सांगितले.

वेदीकाला इंजेक्शन दिल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी, ‘कष्टाचं आज चीज झालं’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘परदेशातून हे इंजेक्शन आणतेवेळी त्या इंजेक्शनच्या मूळ किमतीवर 6 कोटींचा आयात शुल्क आकारण्यात आला. सौरभ शिंदे यांनी माजी आमदार विलास लांडे आणि संकेत भोंडवे यांच्या माध्यमातून आयात शुल्क माफी संदर्भात विनंती केली.

तत्पूर्वी संसदेच्या अधिवेशनात वेदिका शिंदे हिचा उल्लेख करत या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी पत्रव्यवहार करून व संपर्क साधून ६ कोटी रुपये आयात शुल्क माफीचा निर्णय मंजूर करून घेतला. निरंतर पाठपुराव्याला अखेर यश मिळाले अशी फेसबुक पोस्ट खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लिहिली आहे.

क्राऊड फंडीगच्या माध्यमातून उभारले 16 कोटी रुपये 

जनुक बदलण्याचा उपचार असलेल्या झोलजेंस्मा इंजेक्शनची किंमत 16 कोटी रूपये (2.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर) आहे आणि मुलीला वाचवण्यासाठी ते आयात करणे भाग होते. वेदिकाच्या पालकांनी त्यांची समस्या फंडरेझिंग माध्यम मिलापवर सांगितली आणि जगभरातील ऑनलाईन दात्यांना मदतीची विनवणी केली.

मार्च महिन्यात सुरू झालेल्या ह्या फंडरेझर अभियानाला अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला. तीन महिन्यांच्या आत एकूण 14.3 कोटी रूपये इतकी धनराशी मिलापच्या अभियानाला समर्थन करणाऱ्या दात्यांच्या सौजन्यामुळे उपलब्ध होऊ शकली. अनेक नेते, अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जनतेला मदतीचे आवाहन केले होते.

यापूर्वीही तीरा कामत या मुलीला याप्रकारे पैसे उभारुन हे इंजेक्शन देण्यात आले होते. वेदीकाच्या पालकांनी देखील क्राऊड फंडीगच्या माध्यमातून पैसे उभारुन आपल्या अकरा महिन्यांच्या परीला इंजेक्शन मिळवून दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर तिच्या पालकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

 

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.