Good Wishes to Amitabh: अमितजी, गेट वेल सून… हीच प्रत्येकाची सदिच्छा!

Good Wishes to Amitabh: Amitji, get well soon ... this is everyone's wish! मान्यवरांसह लाखो चाहत्यांच्या अमिताभ बच्चन यांच्यावर सदिच्छांचा पाऊस!

एमपीसी न्यूज – महानायक बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आणि त्यांचा पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांच्या करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना काल रात्री मुंबईतील नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

या दोघांनीही करोनावर यशस्वी मात करुन लवकरात लवकर बरे व्हावे अशा सदिच्छांचा पाऊस सध्या सोशल मिडियावर पडत आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानेही अमिताभ यांच्यासाठी संदेश दिला. ‘अमितजी काळजी घ्या. तुमच्या चांगल्या आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो. तसेच तुम्ही लवकर बरे व्हावे, हीच सदिच्छा!’, असे सचिनने ट्विटमध्ये लिहिले.

तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘महानायक अमिताभ बच्चनजी हे कोरोना वर मात करुन पुन्हा उत्साहाने नवी ऊर्जा घेऊन आपल्या चाहत्यांसमोर नवीन भूमिका घेऊन परततील, “शहेनशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करुन आपल्याला “आनंद” देतील हीच सदिच्छा’, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांना करोना झाल्याचं समजताच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळजी व्यक्त केली आहे. तसंच लवकर बरे व्हा अशा सदिच्छाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

परेश रावल, रितेश देशमुख, मनोज बाजपेयी, रविना टंडन, तापसी पन्नू, सोनम कपूर आहुजा, बिपाशा बसू, लारा दत्ता, परिणीती चोप्रासह अन्य सेलिब्रिटींनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी अमिताभ यांच्या प्रकृतीची चांगल्याप्रकारे काळजी घेतली जाईल असा संदेश पाठवला आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांनीही ‘गेट वेल सून’ म्हणत अमिताभ यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली.

‘आदरणीय अमिताभ बच्चनजी, तुम्ही आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगावर कणखर मनोबलाच्या जोरावर मात केली. आता करोना विरुद्धच्या लढाईतही आपण विजयी व्हाल व ठणठणीत बरे होऊन घरी परताल, असा मला आणि संपूर्ण देशाला विश्वास आहे. आमच्या सर्वांच्या प्रार्थनांचं बळ सदैव तुमच्यासोबत आहे’, अशी कळकळ अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केली.

अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्याची बातमी काळजीत टाकणारी आहे. अमिताभ यांना लवकरात लवकर आराम पडावा, अशी मी प्रार्थना करते. ‘प्लीज गेट वेल सून’, असे आर्जव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. समाजवादी पक्षाचे नेते व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही अमिताभ यांच्यासाठी प्रार्थना केली.

अमिताभ यांचे 75 टक्के लिव्हर निकामी

50 हून अधिक वर्षांच्या करिअरमध्ये अमिताभ बच्चन हे बऱ्याचदा आजारी पडले. यामुळे त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करावं लागलं होतं. 77 वर्षांचे असलेल्या अमिताभ बच्चन यांचे फक्त 25 टक्के लिव्हर सध्या काम करत आहे. हॅपेटायटिसच्या इन्फेक्शनमुळे त्यांचे 75 टक्के लिव्हर हे निकामी झाले आहे. वर्ष 2000 पर्यंत ते ठणठणीत होते. पण एका वैद्यकीय तपासणीत त्यांच्या लिव्हरला इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. यामुळे सध्या त्यांच लिव्हर फक्त 25 टक्के इतकच काम करतंय.डॉ. अमोल जोशी आणि डॉ. अविनाश अरोरा उपचार करत आहेत. डॉ. अमोल जोशी गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.

सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण, अभिनेत्री रेखा यांचा बंगला ‘सील’

योगायोगाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण झाल्याने त्यांचा बंगला देखील सील करण्यात आला आहे.अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्याआधी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती. सर्वातआधी कनिका कपूरला या विषाणूची लागण झाली होती. यानंतर किरण कुमार, करीम मोरानी आणि त्याच्या दोन मुली जोआ आणि शाजा मोरानीही करोना पॉझिटिव्ह होते. बोनी कपूर, आमीरखान यांच्या ही स्टाफला करोनाची लागण झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.