Pimpri Crime News : ‘माझी वेळ आल्यावर दाखवतो मी कोण आहे ते’ अशी पोलिसांना धमकी; तडीपार आरोपीस कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज – तडीपार केलेल्या आरोपीने शहराच्या हद्दीत आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ‘तुम्ही चूक करताय. माझी वेळ आल्यावर दाखवतो मी कोण आहे ते’ अशी धमकी देत धक्काबुक्की केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 22) दुपारी पावणे पाच वाजता वैभवनगर, पिंपरीगाव येथे घडली.

अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (वय 28, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गणेश करपे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी अतुल पवार याला 19 जानेवारी 2021 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो जिल्ह्याच्या हद्दीत आला. त्यासाठी त्याने शासनाची अथवा पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नाही.

आरोपी अतुल पवार हा पिंपरीगावात नदीच्या बाजूला थांबला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी त्याने पोलिसांना धक्काबुक्की करत पोलिसांच्या अंगावर धावून जात ‘तुम्ही चूक करताय. माझी वेळ आल्यावर दाखवतो मी कोण आहे ते’ अशी धमकी दिली.

पोलिसांनी अतुल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक डोंब तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.