Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात उद्धव ठाकरे रस्त्यावर, महाविकासआघाडीचा 17 डिसेंबरला विराट मोर्चा

एमपीसी न्यूज : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेत्यांकडून होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे.(Uddhav Thackeray) 17 डिसेंबरला महाविकासआघाडी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे. फक्त राज्यपालच नाही तर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात हा मोर्चा असेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीला उद्धव ठाकरे, अजित पवार, संजय राऊत, जयंत पाटील, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, विनायक राऊत, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, भाई जगताप हे नेते उपस्थित होते.
‘सरकार कायदेशीर का बेकायदेशीर हे अजून ठरायचं आहे, पण राज्यपालांकडून महाराष्ट्रात आपल्या महापुरुषांचा सातत्याने अपमान होत आहे. (Uddhav Thackeray) कर्नाटक सरकार आक्रमक भूमिका घेत आहे. महाराष्ट्रातील गावं दुसऱ्या राज्यात जायचं म्हणत आहेत. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत. लवकरच कर्नाटकात निवडणूक होत आहे, म्हणून आपली गावं त्यांना देणार का?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
‘आज मंत्री कर्नाटकात जाणार होते, पण तिथल्या मंत्र्यांनी इशारा दिला म्हणून गेले नाहीत,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
‘आम्ही बेळगावला कधीही जाऊ शकतो. ज्याची जबाबदारी आहे ते स्वीकारणार आहेत का नाही? का गुवाहाटीला जाऊन बोलणार? सरकारने जाहीर करावं आम्हाला जमणार नाही, मग बेळगाव आणि सरकार चालवण्यापासून मी सर्व करतो,’ असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे.
येत्या 17 तारखेला अतीभव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा अपमान होत असल्याने आता महाराष्ट्राच्या शक्तीचं विराट दर्शन दाखवलं पाहिजे. (Uddhav Thackeray)जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विरोट मोर्चा काढण्यात येणार असून त्यामध्ये सर्वांनी सामिल व्हावं. हा केवळ राजकीय विषय नाही, तर राज्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.